टॉयलेटमध्ये सापडली चिठ्ठी, ८ तास विमान हवेतच; सकाळी मुंबई एअरपोर्टला उतरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 19:07 IST2025-03-10T19:05:11+5:302025-03-10T19:07:23+5:30
ही फ्लाईट आता ११ मार्च रोजी पहाटे ५ वाजता पुन्हा न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेईल.

टॉयलेटमध्ये सापडली चिठ्ठी, ८ तास विमान हवेतच; सकाळी मुंबई एअरपोर्टला उतरलं
मुंबई - सोमवारी सकाळी मुंबई ते न्यूयॉर्क जाणाऱ्या एअर इंडिया विमान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली. ८ तास ३८ मिनिटे उड्डाणानंतर ही फ्लाईट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. या फ्लाईटमध्ये १९ क्रू मेंबरसह ३२२ प्रवासी होते. फ्लाईटच्या टॉयलेटमध्ये मिळालेल्या एका नोटमुळे विमानात दहशत पसरली, या नोटमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव वाटेतूनच ही फ्लाईट पुन्हा मुंबईला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, सकाळी १०.२५ मिनिटांनी एअर इंडियाचं हे विमान मुंबईत उतरलं. एअर इंडिया फ्लाईट AI119 ने मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल २ वरून रात्री १.४३ मिनिटांनी न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेतले होते. विमान प्रवास सुरू असताना टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यात बॉम्बने विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने विमान पुन्हा सुरक्षितपणे मुंबईत परतले. या फ्लाईटमध्ये ३२२ प्रवासी प्रवास करत होते असं त्यांनी सांगितले.
तर ही फ्लाईट आता ११ मार्च रोजी पहाटे ५ वाजता पुन्हा न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेईल. या विमानातील ३२२ प्रवाशांच्या राहण्याची, जेवणाची आणि अन्य आवश्यक मदत कंपनीकडून करण्यात येईल. प्रवाशांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी कंपनी प्रशासन प्रयत्न करत आहे. प्रवाशांची आणि क्रू मेंबरची सुरक्षा याला आमचे प्राधान्य आहे. सध्या तपास यंत्रणा फ्लाईटमध्ये चिठ्ठी कुणी ठेवली याचा शोध घेत आहेत असं एअर इंडियाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, याआधी ६ मार्च रोजी शिकागोहून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान तांत्रिक बिघाडामुळे ५ तासानंतर परत शिकागोलाच गेले होते. यातील प्रवाशांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती. ६ मार्च रोजी ग्रीनलँडवर विमान होते, तेव्हा विमानातील १२ पैकी ११ टॉयलेट बंद झाले होते. जवळपास ३०० प्रवाशांसाठी केवळ एकच टॉयलेट सुरू होते तेदेखील बिझनेस क्लासमध्ये होते. त्यामुळे १४ तासांच्या या प्रवासात होणारी समस्या पाहून हे विमान पुन्हा शिकागोच्या ओहारे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले.