मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:04 IST2023-03-29T11:04:18+5:302023-03-29T11:04:40+5:30

३१ मार्चपासून पुढील ३० दिवस मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. 

A month-long run for water in Mumbai; Daily water cut for 30 days from Friday | मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात

मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात

मुंबई : मुंबईलापाणी पुरवठा करणाऱ्या ‘जलवाहिनी २’ला मुलुंडमध्ये गळती लागण्याची घटना घडून २४ तास उलटत नाहीत तोच कूपनलिकेच्या खोदकामामुळे ठाणे येथे जलबोगद्याला गळती लागल्याचा प्रकार मंगळवारी घडला. जलबोगद्याच्या गळती दुरुस्तीचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ मार्चपासून पुढील ३० दिवस मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. 

मुंबई महापालिकाअंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा हा भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्के पाणीपुरवठा ५ हजार ५०० मिलिमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचली आहे. या जलबोगद्याला गळती लागली असून, ही गळती रोखण्यासाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, असे संबंधित यंत्रणेच्या वतीने सांगण्यात आले.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

या दुरुस्तीच्या काळात मुंबई शहर व उपनगराचा पाणीपुरवठा खंडित होणार असून, मुंबई व पालिकेतर्फे ठाणे शहरास केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३१ मार्चपासून ३० दिवस १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरांतील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा तसेच, कपातीच्या कालावधित काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: A month-long run for water in Mumbai; Daily water cut for 30 days from Friday