मला सहन होत नाही... म्हणत विवाहितेने संपवले आयुष्य; का उचलले टोकाचे पाऊल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:55 IST2025-10-01T13:55:43+5:302025-10-01T13:55:56+5:30
थाटामाटात दोन वर्षापूर्वी बहिणीचे लग्न लावले. मात्र लग्नानंतर मद्यपी पतीकडून मानसिक, शारीरिक छळ सुरू झाला.

मला सहन होत नाही... म्हणत विवाहितेने संपवले आयुष्य; का उचलले टोकाचे पाऊल?
मुंबई : थाटामाटात दोन वर्षापूर्वी बहिणीचे लग्न लावले. मात्र लग्नानंतर मद्यपी पतीकडून मानसिक, शारीरिक छळ सुरू झाला. शिवीगाळ, मारहाणीने सीमा गाठली. हा छळ मला सहन होत नाही आहे, मी आत्महत्या करेन, माझ्या मुलीची काळजी घ्या, अशी विनवणी करताच भावाने तिला परत गावी आणण्याचे आश्वासन दिले. तिकीटही बुक केले. मात्र, तिने आयुष्य संपवले. ही घटना भांडुपमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी भावाच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला.
सिंधू मौर्या (२४) असे मृत विवाहितेचे नाव असून, ती मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी होती. २०२३ मध्ये उत्तर प्रदेशच्या अनिल कुश मौर्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर ते भांडुप टँक रोड येथे राहण्यास आले. तिच्या पतीने जास्त प्रमाणात दारू पिण्यास सुरुवात केल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले. नशेत तिला मारहाण, शिवीगाळ सुरू झाली. तिने याबाबत भावासह आईला वेळोवेळी सांगितले. माहेरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात बदल झाला नाही. १५ दिवसांपूर्वीही सिंधूने भावाला फोन करून पतीकडून छळ वाढत असल्याचे सांगितले. 'मला आता सहन होत नाही, पतीही सतत आत्महत्या करण्यास सांगत आहे. मला जगण्याची इच्छा नाही. फक्त माझ्या मुलीची काळजी घ्या' सांगतच तिला लवकरच गावी घेऊन येणार असल्याचे सांगितले. ३ ऑक्टोबरचे तिकीटही बुक केले होते.
कुटुंबीयांना बसला धक्का
बहिणीची यातून लवकरात लवकर सुटका करण्याच्या विचारात असतानाच, २२ सप्टेंबर रोजी भांडुप पोलिस ठाण्यातून आलेल्या कॉलने कुटुंबीयांना धक्का बसला. सिंधूने पतीसोबत झालेल्या भांडणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. काही वेळाने तिचा मृत्यू झाल्याचे समजताच पायाखालची जमीन सरकली. अखेर, बहिणीचा अंत्यविधी करून शनिवारी त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.