Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर धडकणारा मराठा मोर्चा वाटेतच अडवला; आंदोलक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 11:06 IST

या मोर्चाला गिरगाव चौपाटीपासून सुरूवात झाली, मराठा समाजाला ५० टक्क्यांतील आतमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

मुंबई – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा निघाला. गनिमी कावा पद्धतीने मराठा आंदोलक शहीद तुकाराम ओंबळे चौकात जमले. त्यानंतर तिथून पायी मोर्चा वर्षा बंगल्याकडे निघाला. या आंदोलनाची माहिती पोलिसांना होती त्यामुळे पोलिसांनी इथं मोठा बंदोबस्त लावला होता. मराठा मोर्चाची ताकद लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षेची खबरदारी घेतली. त्यानंतर काही अंतरावर पायी चालत गेल्यानंतर पोलिसांनी मराठा मोर्चा वाटेतच अडवला आणि आंदोलकांना ताब्यात घेतले.

या मोर्चाला गिरगाव चौपाटीपासून सुरूवात झाली, मराठा समाजाला ५० टक्क्यांतील आतमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. वर्षा बंगल्यावर आम्ही न्याय मागण्यासाठी निघालो आहोत. ही फक्त झाकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे. आम्ही अनेक वर्ष आंदोलन करतोय. सरकारकडे न्याय मागतोय मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही आमची भूमिका जुनीच आहे. सरकार असो वा विरोधक असो या सगळ्यांनी मराठा समाजाला गाजर दिलं आहे. त्यामुळे शिंदे सरकार आमचे मायबाप आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात आम्हाला न्याय द्या अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली.

तसेच मराठा समाजाचे आंदोलन राज्याच्या चारही दिशांना आहे. आता सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा. आमचे आंदोलन नवीन नाही. तुळजापूर ते मुंबई आम्ही पायी आलो, ९६ दिवस आझाद मैदानावर बसलो आहोत. जी मागणी समाजाने केली तीच आम्ही करतोय, आमची मागणी संविधानिक आहे असं सांगत मराठा आंदोलकांनी गिरगाव चौपाटी इथं एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या. वर्षा बंगल्यापर्यंत निघालेला हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणएकनाथ शिंदे