बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत वकिलाकडून उकळले तब्बल २ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:34 IST2025-10-07T09:34:04+5:302025-10-07T09:34:28+5:30
तक्रारदार वकील यांनी ३ ऑक्टोबर रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. तक्रारदार वकील हे प्रतिष्ठित व्यक्ती असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत वकिलाकडून उकळले तब्बल २ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका ५१ वर्षीय वकिलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन एका महिलेने २ कोटी रुपये उकळल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी हिमाचलच्या पारूल राणा, तिचे वडील हरविंदर राणा, आई मीना, बहीण निधी आणि मैत्रीण कोनिका वर्मा यांच्यावर खंडणी आणि बदनामीसह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार वकील यांनी ३ ऑक्टोबर रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. तक्रारदार वकील हे प्रतिष्ठित व्यक्ती असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एफआयआरनुसार, मे २०२४ मध्ये पीडित वकिलाची ओळख पारूल राणा हिच्याशी त्यांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक आणि सोशल मीडिया आयडी शेअर केले. जून २०२४ मध्ये जेव्हा तक्रारदार जिनिव्हा येथे एका परिषदेसाठी गेले होते, तेव्हा पारूलने रात्री उशिरा कॉल करून तिच्या नातेवाईकाची प्रकृती खालावल्याचे सांगत ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यावर वकिलाने तिला बँक खात्यातून २.५ लाख रुपये पाठवले. भारतात परतल्यानंतर राणाने विविध कारणांनी पुन्हा पैसे मागितले, ज्यामध्ये मॉडेलिंग खर्चाचा उल्लेख होता. एफआयआरमध्ये असेही नमूद आहे की, पीडित वकिलांनी स्वतः विवाहित असून आपल्याला एक मुलगी आहे, अशी माहिती दिल्यानंतरही पारूलने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
खासगी फोटोद्वारे ब्लॅकमेल
पारूल राणाने १० लाख रुपयांची मागणी केली, त्यातील ५ लाख रुपये यांनी मित्राच्या कंपनी खात्यातून दिले. पुढे मुंबई विमानतळावर ३ लाख रुपये आणि तिच्या बहिणीसह तक्रारदाराच्या घरी राहायला आल्यावर आणखी १० लाख रुपये घेतले.
जुलै महिन्यात तक्रारदार आणि राणा हे बाली येथे गेले होते, ज्याचा पूर्ण खर्च तक्रारदारानेच केला. बालीतील सहलीदरम्यान पारूलने पुन्हा एकदा २० लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराने नकार दिल्यानंतर तिने खासगी फोटोद्वारे ब्लॅकमेल करत खोट्या बलात्काराच्या तक्रारीची धमकी दिली. यानंतर राणाचे आई-वडील आणि बहिणीसह मैत्रीण कोनिका वर्मा यांनीही वकिलाला धमकावले.
अखेर पोलिसांत धाव
भीतीपोटी तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने एकूण २ कोटी रुपये दिले, त्यापैकी बहुतांश रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली. शेवटी राणाच्या कुटुंबीयांनी तक्रारदाराच्या पत्नीशी संपर्क साधत त्यांचे संबंध उघड केले आणि पुन्हा पैसे मागितले. अखेर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.