Join us
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या टेंपोचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणाहून बकरे चोरून विक्री करणाऱ्या टोळी पोलिसांच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 17:55 IST

तिन्ही आरोपींना फादरवाडी नाका येथून ९ जूनला ताब्यात घेऊन पाच गुन्ह्यांची उकल करत अडीच लाखांचा छोटा हत्ती जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मंगेश कराळे -नालासोपारा - चोरीच्या टेंपोचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणाहून बकरे चोरून विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश आले आहे. तिन्ही आरोपींना फादरवाडी नाका येथून ९ जूनला ताब्यात घेऊन पाच गुन्ह्यांची उकल करत अडीच लाखांचा छोटा हत्ती जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

नालासोपाऱ्याच्या अलकापुरी महादेव नगर येथे अकील खादीम कुरेशी (३४) यांचे आलिया चिकन व मटन शॉप आहे. ६ जूनच्या रात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून छोटा हत्ती टेंपोमधून कुर्बानीसाठी आणलेले ४५ हजाराचे चार बकरे चोरी करून नेले होते. ९ जूनला आचोळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वसई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अश्याच प्रकारचे गुन्हे घडल्याने सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी आणि अंमलदारांनी समांतर गुन्ह्याचा तपास करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे बकरे चोरी करण्यासाठी चोरीचा टेंपो घेऊन जाणाऱ्या आरोपी मुस्तफा मोहम्मद हाशमी (२४), मोहम्मद कलीम कलाम कुरेशी  (३६) व इबारत अली उर्फ सिद्धू गुलाम हुसैन खान (१९) या तिघांना फादरवाडी नाका येथून सापळा रचून ९ जूनला ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींनी वसई, मुंब्रा परिसरातून बकरे चोरी करून मुंबई येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून अडीच लाखांचा टेंपो जप्त करून ५ गुन्ह्यांची उकल केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, महेश पागधरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे यांनी केली आहे. 

 

 

 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमुंबई