न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचे भासवून महिलेची पावणेचार कोटींना फसवणूक; गुजरातमधील भामट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:37 IST2025-12-30T13:36:58+5:302025-12-30T13:37:39+5:30
जामिनासाठी बनावट ऑनलाइन सुनावणी अन् बरेच काही

न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचे भासवून महिलेची पावणेचार कोटींना फसवणूक; गुजरातमधील भामट्याला अटक
मुंबई : न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचे भासवून ६८ वर्षीय वृद्धेची पावणेचार कोटींना फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुजरातमधील एकाला अटक झाली आहे. भामट्याने मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्याचे कर्मचारी, केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवले. बनावट ऑनलाइन न्यायालयीन सुनावणी घेत एकाने स्वतःची ओळख न्यायमूर्ती चंद्रचूड सांगितली हाेती.
अंधेरी पश्चिम भागात राहणाऱ्या पीडित महिलेला मनी लॉन्डरिंग प्रकरणात ‘डिजिटल अरेस्ट’ असल्याचे सांगत सतत निगराणीखाली ठेवले. हा गुन्हा १८ ऑगस्ट ते १३ ऑक्टोबरदरम्यान घडला,” असे त्यांनी सांगितले. १८ ऑगस्ट रोजी महिलेला फोन आला. कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत तिच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी झाल्याचा आरोप केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची माहिती कुणालाही सांगू नये, अशी धमकी देत त्याने बँक तपशील मागितले आणि तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले. स्वतःला अधिकारी एस. के. जैस्वाल असे भासवणाऱ्या आरोपीने पीडित महिलेकडून तिच्या आयुष्यावर दोन ते तीन पानांचा निबंधही लिहून घेतला. त्यानंतर तिच्या निरपराधतेची खात्री झाल्याचे सांगत तिला जामीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला व्हिडीओ कॉलद्वारे एका व्यक्तीसमोर हजर केले, ज्याने स्वतःची ओळख ‘न्यायमूर्ती चंद्रचूड’ अशी करून दिली. गुंतवणुकीची माहिती पडताळणीसाठी सादर करण्यास सांगितले गेले. यामुळे तिने दोन महिन्यांच्या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये एकूण ३.७५ कोटी रुपये ट्रान्सफर केले.
रॅकेटमधील मुख्य सूत्रधार परदेशात
तपासात तिचे पैसे अनेक ‘म्यूल अकाउंट्स’मध्ये वर्ग झाल्याचे आढळले, त्यापैकी एक खाते गुजरातमधील सुरत येथे होते. त्यानुसार, सायबर पोलिसांच्या पथकाने गेल्या आठवड्यात सुरत येथून एका व्यक्तीला अटक केली.
कापड व्यापाराशी संबंधित बनावट कंपनी स्थापन करून चालू खाते उघडले होते. या खात्यामध्ये सायबर फसवणूक करणाऱ्यांचे पैसे ठेवण्यात आले होते. त्याच्या खात्यात जमा १.७१ कोटी रुपयांच्या बदल्यात त्याला ६.४० लाख रुपयांचे कमिशन मिळाले. रॅकेटमधील दोन सूत्रधार सध्या परदेशात आहेत. त्यापैकी एकाचा इमिग्रेशन, व्हिसा सेवा व्यवसाय असून याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीच्या घटना : ७७ वर्षीय डॉक्टर महिलेस तब्बल आठ दिवस डिजिटल अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी तब्बल तीन कोटी रुपये उकळले.
प्राध्यापकाला तीन महिने ‘डिजीटल’ अटक
शहरातील ८५ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापकाला तब्बल तीन आठवडे डिजिटल अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी नऊ कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे.
२८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान हा त्यांना आभासी अटकेत ठेवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवत सायबर
पोलिस तपास करत आहे.
११ महिन्यांत १६४ गुन्हे -
यावर्षी गेल्या ११ महिन्यांत मुंबईत ४,२२२ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यापैकी २,८९१ गुन्हे सायबर फसवणुकीचे आहेत. तर डिजिटल अरेस्ट संबंधित १६४ गुन्हे नोंद झाले असून ६४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत ८९ जणांना अटक करण्यात
आली आहे.