रसिकांना मेजवानी, विजयादशमीचा मुहूर्त साधत सहा नवीन नाटकांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:50 IST2025-10-03T13:49:26+5:302025-10-03T13:50:03+5:30
विजयादशमीचा मुहूर्त साधत नवीन नाटकांची घोषणा करण्याची परंपरा मराठी व्यावसायिक रंगभूमीने यंदाही जपली आहे.

रसिकांना मेजवानी, विजयादशमीचा मुहूर्त साधत सहा नवीन नाटकांची घोषणा
मुंबई : विजयादशमीचा मुहूर्त साधत नवीन नाटकांची घोषणा करण्याची परंपरा मराठी व्यावसायिक रंगभूमीने यंदाही जपली आहे. दसऱ्याचे औचित्य साधत सहा नाटकांची घोषणा करीत मराठी रंगभूमीने जणू ‘नाट्य षटकार’ ठोकला आहे.
मराठी रंगभूमीवर सध्या नवीन नाटकांच्या जोडीला जुनी गाजलेली नाटकेही रसिकांचे मनोरंजन करत आहेत. रसिकांकडूनही या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात आता ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’, ‘कुणीतरी आहे तिथं’, ‘करुणाष्टके’, ‘सेकंड इनिंग्ज’, ‘एक नातं असंही’ आणि ‘उष:काल होता होता...’ यांची भर पडणार आहे. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत. नव्या पिढीचे, नव्या युगाचे हे नाट्य विनोद रत्ना यांनी लिहिले आहे.
‘करुणाष्टके’चा दिवाळीत प्रयोग
अश्वमी थिएटर्स निर्मित आणि अद्वैत थिएटर्स प्रकाशित ‘कुणीतरी आहे तिथं’ हे नाटक दिवाळी पाडव्याला रंगभूमीवर येणार आहे. महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेल्या या नाटकाचे लेखन सुरेश खरे यांनी केले असून, दिग्दर्शन कुमार सोहोनी यांचे आहे. राहुल भंडारे सहनिर्माते असलेल्या या नाटकातील कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यात आहेत.
भद्रकाली प्रोडक्शनचे प्रसाद कांबळी सादर करीत असलेल्या ‘करुणाष्टके’मध्ये उंबरठ्या पलीकडची गोष्ट पाहायला मिळणार आहे. यात मुख्य भूमिकेतील पर्ण पेठे आणि गीतांजली कुलकर्णी यांच्यासोबत कल्याणी मुळे, केतकी सराफ, माधुरी भारती, किरण खोजे, प्रतीक्षा खासनीस, विनायक चव्हाण हे कलाकार आहेत. प्राजक्त देशमुख यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक दिवाळीला येणार आहे.
विस्मय कासारांचे लेखन
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला हवे असणारे ‘एक नातं असंही’ हे नाटक विस्मय कासार यांनी लिहिले असून, दर्शन घोलप यांनी दिग्दर्शित केले आहे. यात मृण्मयी सुमन, विस्मय कासार, प्रवीण भाबल, मोहिनी, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सृजल दळवी हे कलाकार आहेत.
‘उष:काल होता होता’
नाट्यविहार कलामंच निर्मित ‘उष:काल होता होता...’चे लेखन श्याम रंजनकर यांनी केले असून, दिग्दर्शन डॉ. प्रदीप सरवदे करीत आहेत. सुरेश सागरे याचे निर्माते आहेत.