कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 23:01 IST2025-10-07T23:00:21+5:302025-10-07T23:01:21+5:30
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि दिनकरराव जवळकर यांच्या पुस्तकांचं वाटप करत असताना एका नर्सने अपमानास्पद वर्तन करून ही ...

कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि दिनकरराव जवळकर यांच्या पुस्तकांचं वाटप करत असताना एका नर्सने अपमानास्पद वर्तन करून ही पुस्तके भिरकावून दिल्याचा आरोप एका निवृत्त कर्मचाऱ्याने केल्याने खळबळ उडाली होती. तसेच या प्रकारावरून चौफेर टीकाही झाली होती. दरम्यान, या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं असून, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कस्तुरबा रुग्णालयातील परिचारकांची भेट घेतल्यानंतर १०० वर्षांपूर्वीची पुस्तकं वाटून काय साध्य करायचे होते असा प्रतिप्रश्न या प्रकरणी तक्रार करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याला विचारला आहे.
कस्तुरबा रुग्णालयातील कदम एका माजी कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे आणि दिनकरराव जवकर यांच्या देशाचे दुश्मन या पुस्तकांच्या प्रतींचं वाटप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही परिचारिकांनी ही पुस्तके न घेता भिरकावून दिली होती. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. त्यानंतर संतापाची लाट उसळली होती.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि स्थानिक आमदार मनोज जामसुतकर यांनी कस्तुरबा रुग्णालयाला भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, संबंधित महिला परिचारिकांनी आपल्या कृतीमुळे कुणी दुखावले गेले असल्यास दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो असे सांगितले आहे. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळातील सुमारे १०० वर्षांपूर्वीची पुस्तके वाटून नेमकं काय साध्य करायचं होतं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच पेडणेकर यांनी या घटनेच्या समोर आलेल्या व्हिडीओच्या सत्यतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हा व्हिडीओ किती खरा आहे हे पोलीस शोधून काढतील असेही त्या म्हणाल्या.
तसेच निवृत्त कर्मचारी असलेल्या कदम यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिलेला आहे. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आलेल्या होत्या. त्यांनी केलेल्या पुस्तक वाटपामागे नेमका कोण होता? याचाही शोध घेतला गेला पाहिजे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.