दुबईत मैत्री करून मुंबईत लांबवला ७५ लाखांचा हिरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:16 IST2023-09-24T08:15:40+5:302023-09-24T08:16:07+5:30
२७ ऑगस्ट रोजी उमित यांनी मुंबईत आर्यनला व्हाॅट्सअप व्हिडिओ कॉल करून दुसऱ्या दिवशी महेश ऑफिसला येईल.

दुबईत मैत्री करून मुंबईत लांबवला ७५ लाखांचा हिरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुबईमध्ये एका व्यक्तीशी मैत्री झाल्यानंतर चारवेळा व्यवहार करणाऱ्यानेच विश्वासघात केला. मैत्रीच्या आड महेश वसोया (४४) याने व्यापाऱ्याच्या वांद्रे येथील कार्यालयातून ७५ लाख रुपयांचा हिरा पळवला. या प्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार आर्यन रूपरेल (२१) या हिरे व्यापाऱ्याचे वडील उमित हे व्यवसायानिमित्त दुबई आणि लंडनला ये-जा करत असून गेले वर्षभरापासून ते तिथेच राहत आहेत. त्यांची तिथेच गुजरातचा रहिवाशी महेश याच्याशी ओळख झाली आणि त्याने उमितकडून चारवेळा हिरे खरेदी करत त्याचे पैसे रोख स्वरूपात दिले. त्यामुळे त्याच्यावर उमित यांचा विश्वास बसला.
दरम्यान २७ ऑगस्ट रोजी उमित यांनी मुंबईत आर्यनला व्हाॅट्सअप व्हिडिओ कॉल करून दुसऱ्या दिवशी महेश ऑफिसला येईल. तेव्हा त्याला ३.७५ कॅरेटचा विशिष्ट हिरा दे असे सांगितले. महेश हा तक्रारदाराच्या वांद्रे येथील अबॅकस जेम्स ज्वेलरी नावाच्या दुकानात सव्वा दहाच्या सुमारास पोहोचला. वडिलांच्या सांगण्यानुसार त्याला आर्यनने ७५ लाखांचा हिरा दिला. त्याचे पैसे तो रोख आणि ऑनलाइन स्वरूपात देणार होता. मात्र महेश याने पैसे दिलेच नाहीत तसेच त्याने फोनही बंद केला. तेव्हा फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.
अन्य दोघांना अडीच कोटींचा लावला चुना
भामट्या महेशने त्यांचे वसईमधील परिचित व्यावसायिक विनूभाई पटेल यांना २३ लाख तर व्यापारी महेश कुमार यांना २ कोटी ३० लाख रुपयांचा चुना लावल्याचे आर्यनला समजले. आर्यनने या विरोधात वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.