Join us

तक्रारीवर कारवाईसाठी पोलिसाकडून मुलीची मागणी, ज्येष्ठ नागरिकाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 07:18 IST

अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : मुलाच्या लग्नासाठी सदनिका विक्री करताना झालेल्या फसवणुकीची तक्रार करणाऱ्या ७३ वर्षीय वृद्ध नागरिकाकडून आधी पैसे, मिठाई घेतल्यानंतर मुलीची मागणी केल्याची तक्रार भाईंदर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाविरुद्ध करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्तांनी उपायुक्तांमार्फत चौकशी सुरू केली.

भाईंदर पूर्वेला राहणारे सोहनलाल जांगीड यांची एक सदनिका पश्चिमेस क्रॉस गार्डनजवळ आहे. मुलाचे लग्न व पैशांची गरज असल्याने ती सदनिका विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, व्यवहारात एक महिला इस्टेट एजंट व खरेदीदार महिला यांनी फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात दिली होती.

भावना फाउंडेशनच्या भावना तिवाडी यांना घेऊन सोहनलाल हे कारवाईसाठी पोलिस निरीक्षक मुगुट पाटील यांना भेटले होते.  पोलिसांकडे सोहनलाल सतत पाठपुरावा करत होते. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडून मिठाई मागण्यात आली. ती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पाकिटात टाकून काही रक्कमसुद्धा पोलिसांना दिली. तरीदेखील पोलिस तक्रार अर्जावर कारवाई करत नसल्याने सोहनलाल हे विचारणा करत होते. त्यावर पोलिस निरीक्षक मुगुट पाटील यांनी ‘भावना तिवाडीसारखी मुलगी दे’, अशी मागणी केली. या प्रकाराचा जाब विचारायला भावना यांच्यासह आत्मस्वाभिमान वेल्फेअर संस्थेच्या रेणू रॉय व अन्य तसेच सोहनलाल हे मुगुट पाटील यांच्या दालनात गेले. त्यांनी गोंधळ घालत अपशब्द, शिवीगाळ केल्याबद्दल सोहनलाल व संबंधितांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांना भेटून भावना, रेणू आदींनी तक्रारी केल्या आहेत.

उपायुक्तांमार्फत प्रकरणाची चौकशी

भावना यांच्या तक्रारीवर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी वसई परिमंडळाच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनी चौकशी सुरू केली असून, भावना यांचा जबाब नोंदवून घेतला. उपायुक्त चौगुले पोलिस चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत. 

आरोप खोटा असल्याचा दावा

 इस्टेट एजंटने घेतलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी ते व भावना यांनी आपणास सांगितले होते. परंतु, ते आपले काम नसल्याचे त्यांना सांगितले होते.  मुलगी मगितल्याचा, पैसे दिल्याचा त्यांचा आरोप खोटा असून, कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मुगुट पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई पोलीसपोलिसगुन्हेगारी