भुताटकीच्या नावाखाली चिमुकल्याला दिले चटके, भांडुपमधील अघोरी प्रकार उघड! दाम्पत्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:47 IST2025-06-27T16:46:10+5:302025-06-27T16:47:20+5:30
भूतबाधा झाल्याचा दावा करत मोलकरणीच्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला चटके देत वेताच्या काठीने बेदम मारहाण करण्याचा अघोरी प्रकार भांडुपमध्ये समोर आला आहे.

भुताटकीच्या नावाखाली चिमुकल्याला दिले चटके, भांडुपमधील अघोरी प्रकार उघड! दाम्पत्याला अटक
भूतबाधा झाल्याचा दावा करत मोलकरणीच्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला चटके देत वेताच्या काठीने बेदम मारहाण करण्याचा अघोरी प्रकार भांडुपमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी वैभव कोकरे (३५) आणि त्याची पत्नी हर्षदा गुरव (३२) या दोघांना अटक केली आहे. या दाम्पत्याने महिलेचा मोबाइल बंद करत तिला घरातच कोंडून ठेवले होते. अकेर नैराश्याने पिचलेल्या या महिलेने भानावर येताच नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर दोघांची सुखरुप सुटका झाली आहे.
आरोपी कोकरे दाम्पत्य जंगल मंगल रोड परिसरात राहतात या दाम्पत्याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाल्याचे समजते. त्यांची बाटली बंद पाणी वितरणाची एजन्सी असून ३७ वर्षीय तक्रारदार गार्गी कदम या त्यांच्या दुकानात कामाला होत्या.
कोकरेने तिला घरीदेखील कामाला बोलावले. त्यानंतर गेल्या १५ जूनपासून कोकरेच्या घरीदेखील काम करू लागल्या. कामावर जाताना त्या सोबत अडीच वर्षाच्या मुलालाही घेऊन जात असत. कामादरम्यान भूतबाधा झाल्याचे वैभव आणि त्याची हर्षता गुरव यांनी तक्रारदाराला सांगितले.
कुटुंबीयांशीही संपर्क तुटला
१. मुलाला झालेली भूतबाधा आम्ही उतरवतो, असे सांगून त्यांनी मुलाला चटके दिले. तसेच त्याला काठीने मारहाण सुरू केली. काही दिवसांनी महिलेलाही ते घरातच थांबवून ठेवू लागले.
२. तिचा मोबाइलही त्यांनी बंद ठेवल्याने सोमवारपासून तिचा कुटुंबीयांशीही संपर्क तुटला. भानावर आल्यानंतर गार्गी यांनी नातेवाईकांशी संपर्क साधलाय तेव्हा कुटुंबीयांनी वैभवचे घर गाठत दोघांची सुटका केली.
३. त्यानंतर हा अघोरी प्रकार समोर आला. मुलाला आणि त्याच्या आईला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला.
घरी पण सोडत नव्हते...
पीडित मुलाचे काका दत्ताराम कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ आणि पीडित मुलाचे वडील जानेवारी महिन्यात ब्रेन स्ट्रोक आल्याने अंथरुणावरच पडून आहेत त्यामुळे त्यांच्या पत्नीवर घराची सर्व जबाबदारी होती. दोन पैसे मिळतील म्हणून तिने घरकामालाही तयारी दर्शवली. घरकामाला जायला लागल्यापासून त्यांच्या स्वभावातही बदल जाणवू लागला. कोकरे जसा बोलायचा, तशी वहिनी वागायची. कोकरे आणि त्याच्या पत्नीने घरी येऊन आजारी पडलेल्या भावालाही मारहाण केली. सोमवारपासून वहिनीचाही संपर्क तुटला. बुधवारी तिने चुलत्यांना कॉल करुन मदत मागितली. त्यानंतर आम्ही कोकरेच्या घरी जाऊन दोघांची सुटका केली.
कोकरे दाम्पत्याला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी
पीडित मुलाला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवत कोकरे दाम्पत्याला अटक केली आहे. त्यांना ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
- जितेंद्र आगरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, भांडुप