Shiv Sena ( Marathi News ): मुंबई- 'आपण निवडणूक आयोगावर केस करायला पाहिजे, त्यांनी आपल्याला शपथ पत्र आणि १०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञा पत्र बनवण्यासाठी कामाला लावलेलं होतं. निवडणूक आयोगाने त्याच काय केलं, एकतर ते स्विकारा नाहीतर त्याचा खर्च किती आला असेल ते पैसे परत द्या,.निवडणूक आयोगाने हा मोठा घोटाळा केला आहे, असा आरोप आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आज ठाकरे गटाने खुली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालाचे विश्लेषण केले. तसेच यापूर्वी शिवसेना पक्षाच्या झालेल्या बैठकांचे व्हिडीओ पुरावेही दाखवले.
या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपवर जोरदार आरोप केले. "२०१३ सालच्या शिवसेनेच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होते ते तुम्ही बघितले आहे. आता ही लोक खोट बोलत आहेत, मला सत्तेचा मोह नाही म्हणून मी त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा लगेच राजिनामा दिला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्षप्रमुखांना सर्वाधिकार देणारी हीच ती बैठक; अनिल परबांनी २३ जानेवारी २०१३ चा व्हिडीओच दाखवला
"उद्धव ठाकरे म्हणाले, आता राज्यात असलेले सरकार असंविधानिक आहे. राज्यपालही या कटात सहभागी झाले होते. आपल्या देशात लोकशाही राहणार की नाही हे सर्व जग पाहत आहे. ही लढाई शिवसेनेची नाही, ही लढाई लोकशाहीची आहे. सर्वाच्च न्यायालयाचे वर्चस्व राहणार आहे की नाही, खरतर शिवनेतील निकाल सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत द्यायचे होते, पण तसे झालेच नाही, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
"निवडणूक आयोगावर केस करायला पाहिजे"
उद्धव ठाकरे म्हणाले, आपण निवडणूक आयोगावर केस करायला पाहिजे, निवडणूक आयोगाने आपल्याला १९ लाख ४१ हजार शपथ पत्र आणि १०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञा पत्र लिहायला कामाला लावले होते. पैसे सामान्य शिवसैनिकांचे गेले आहेत. ती शपथ पत्रे स्विकारा नाहीतर त्याचे पैसे आम्हाला द्या. निवडणूक आयोगाने त्याच काय केलं. हा मोठा घोटाळा आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
अनिल परबांनी २३ जानेवारी २०१३ चा व्हिडीओच दाखवला
यावेळी आमदार अनिल परब यांनी २०१३ च्या बैठकीचे व्हिडीओ दाखवले. यात शिवसेनेतील सर्वाधिकार पक्षप्रमुख यांना दिल्याचा ठराव केल्याचे सांगितले. या बैठकीचा त्यांनी व्हिडीओ दाखवला आणि यातील ठरावही दाखवले. या बैठकीत शिवसेनेतील दिग्गज नेते उपस्थित असल्याचे दिसत आहे. याच बैठकीत पक्षाध्यक्षांकडे असणारे अधिकार पक्षप्रमुख यांच्याकडे सोपावण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी मांडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ दाखवून आमदार अनिल परब यांनी पुरावा दिला आहे.