Join us
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाचार कोटींचे हिरे घेऊन ब्रोकर पसार, बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:20 IST

अवघ्या महिन्याभरात त्याने हा प्रकार केला असून या विरोधात बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

मुंबई : हिरे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करत सव्वाचार कोटी रुपयांचे हिरे घेऊन एक ब्रोकर पसार झाला आहे. अवघ्या महिन्याभरात त्याने हा प्रकार केला असून या विरोधात बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

मालाडला राहणारे तक्रारदार चिरागदास गोंडालिया (वय ३२) हे हिरे व्यापारी असून बीकेसीच्या भारत डायमंड  बोर्समध्ये त्यांचे कार्यालय आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ध्रुवल तेजाणी (२७) याला गेल्या ७ वर्षांपासून ते ओळखतात, तसेच हिऱ्यांचा व्यवहारही करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ६ एप्रिल रोजी तेजाणी हा त्यांच्या कार्यालयात आला आणि हिरे खरेदी करणारा एक चांगला व्यापारी असून त्याला चांगल्या प्रतीच्या हिऱ्यांची गरज आहे, असे त्यांना सांगितले. या व्यवहारात तुम्हाला चांगला नफा होईल, असेही आमिष त्याने दाखविले. 

-  तेजाणी सोबत इतकी वर्षे असलेल्या व्यवसायिक नात्यामुळे गोंडालिया यांनी पावती बनवत त्याला मागितले तितके हिरे दिले. मात्र, त्याने त्याचे पैसे दिले नाहीत. मोबाइल बंद करून पळून गेला. -   गोंडालिया यांनी केलेल्या चौकशीच्या दरम्यान अन्य व्यापाऱ्यांनाही अशाच प्रकारे त्याने फसविल्याचे तक्रारदाराला समजले. तेजाणीने जवळपास ४ कोटी २८ लाख ८ हजार ८५९ रुपयांचे हिरे घेऊन पळ काढला. -   गोंडालिया आणि अन्य व्यापाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी तक्रार मिळाल्यावर बीकेसी पोलिसांनी तेजाणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस