मुंबई - शहरातील मलबार हिल परिसरात एका व्यापाऱ्याने मराठी भाषेचा अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यापाऱ्याने मारवाडीत बोला, इथं मराठी नाही, मुंबई भाजपाची, मुंबई मारवाड्यांची असं एका मराठी महिलेला बोलला त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेकडून संबंधित व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई कोणाची? इधर मारवाडीमे बात करनेका..BJP जीत गयी हैं..समझा? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे तर गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या या घटनेचा निषेध करतो. मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला अशी सक्ती कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे. भाजपाचे नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आपली मुंबई सर्वांची आहे परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया स्थानिक भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
२ डिसेंबर रोजी गिरगाव येथे एक मराठी महिला महादेव स्टोअर नावाच्या दुकानात गेली तेव्हा तिथल्या व्यापाऱ्याने मारवाडी बोला असं म्हटलं. त्यावर महिलेने का हा प्रश्न विचारला. त्यावर तो व्यापारी भाजपा आलंय, आता मारवाडीत बोलायचे, मराठी बोलायचं नाही, मुंबई भाजपाची आणि मुंबई मारवाड्याची असं बोलला. त्यानंतर या महिलेने मला आणि मराठी माणसाला न्याय हवा अशी मागणी केली होती.
दरम्यान, ही महिला तक्रार घेऊन लोढा यांच्याकडे गेल्या मात्र त्यांनी उद्धटपणे उत्तर दिल्याचा दावा महिलेने केला. लोढा यांना आजपर्यंत आम्ही निवडून आणले आता ते आम्हाला ओळखत नाही. मलबार हिलचे तुम्ही आमदार असताना तुम्हाला ओळखच हवी का, मलबार हिलचा नागरिक तुमचा मग त्यांची तक्रार ऐकून सोडवणूक कुणी करायची असा प्रश्न या महिलेने केला. त्यानंतर ही महिला मनसे कार्यालयात गेली तिथे मारवाडीचा आग्रह धरणाऱ्या व्यापाऱ्याला बोलवून मनसेने चोप दिला.