राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 05:24 IST2025-10-20T05:20:32+5:302025-10-20T05:24:18+5:30
निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नका

राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’ची भूमिका घेत जोपर्यंत मतदार याद्यांमधील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा, असा इशारा राज्य निवडणूक आयोगाला रविवारी दिला. राज्यात ९६ लाख खोट्या मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असे ते म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी घरोघरी जाऊन खऱ्या मतदारांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांनी मुंबईत गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केले. या निवडणुकीत ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८ ते १० लाख, ठाण्यात ८ लाख, पुणे, नाशिक असेच प्रत्येक जिल्ह्यात बोगस मतदार आहेत. एका घरात ५००, ७००, १००० मतदारांच्या नावांची नोंद आहे आणि ही सगळी खोटी नावे भरून हे निवडणुकांना सामोरे जायचे म्हणत आहेत, अशी टीका त्यांनी भाजपचे नाव न घेता केली. निवडणुका अशाप्रकारे होत असतील, तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मते द्या अन्यथा नका देऊ, मॅच फिक्सिंग झालेले आहे, असा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
निवडणुका शांततेत हव्या तर ‘मतदार याद्या स्वच्छ करा’
आम्ही निवडणूक आयोगाला बोलत आहोत तर सत्ताधाऱ्यांना राग येतोय, कारण त्यांनी चुकीचे काहीतरी केले आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांचा गुलाम नाही. मतदान यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊच नये. राज्यात निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर अगोदर मतदार याद्या स्वच्छ करा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’
निवडणूक आयोगावर टीका करणारे आणि मतदार यादीतील घोळाबाबत नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा एक व्हिडीओ तसेच भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचे काही व्हिडीओ या मेळाव्यात दाखवले.
निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा १ नोव्हेंबरला मोर्चा
मतदार यादीत घोटाळा असल्याचा आरोप करत यापूर्वी दोन वेळा निवडणूक आयोगाची भेट घेणाऱ्या राज्यातील विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी सर्व विरोधी पक्ष मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात ज्येष्ठ नेते, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसचे नेते तसेच घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
सत्ताधारी आमदारच सांगतात मतदार यादीत बोगस आणि दुबार मतदार आहेत. पैठणचे आमदार विलास भुमरे भाषणात सांगतात मी २० हजार मतदार बाहेरून आणले. भाजप आमदार मंदा म्हात्रे सांगतात ऐरोलीत ४१ हजार व बेलापूरमध्ये ३५ हजार दुबार व बोगस मतदार आहेत. आमदार संजय गायकवाड बुलढाणा जिल्ह्यात १ लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले गेले. मतदार याद्या शुद्ध हव्यात यासाठी हा संघर्ष आहे, असे मोर्चाची घोषणा करताना संजय राऊत यांनी सांगितले.