४८ वर्षे फरार ८१ वर्षीय वृद्धाची निर्दोष सुटका; मैत्रिणीवर केला होता चाकूने प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:36 IST2025-12-07T09:35:11+5:302025-12-07T09:36:14+5:30
१९७७ मध्ये कुलाबा पोलिसांनी चंद्रकांत कळेकर यांना आरोपी ठरविले होते. त्यावेळी त्यांची मैत्रीण अन्य कोणाशी तरी मैत्रीपूर्ण वागत असल्याने त्यांना राग आला होता.

४८ वर्षे फरार ८१ वर्षीय वृद्धाची निर्दोष सुटका; मैत्रिणीवर केला होता चाकूने प्राणघातक हल्ला
मुंबई : खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या ८१ वर्षे वृद्धाची सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केला. हा आरोपी ४८ वर्षे फरारी होता.
१९७७ मध्ये कुलाबा पोलिसांनी चंद्रकांत कळेकर यांना आरोपी ठरविले होते. त्यावेळी त्यांची मैत्रीण अन्य कोणाशी तरी मैत्रीपूर्ण वागत असल्याने त्यांना राग आला होता. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी कळेकर यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर ते फरारी झाले. अखेरीस १९८४ मध्ये त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण डॉर्मंट फाइल बनले. मतदार याद्या आणि इतर कागदपत्रांमधील नोंदींच्या आधारे पोलिसांनी कळेकर यांचा शोध घेतला असता रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात ते सापडले.
मद्यधुंद शिक्षकाचा वर्गातच धिंगाणा, मुलांना शिवीगाळ; कारवाई करण्याची मागणी
सत्र न्यायालयात दोन महिन्यांच्या खटल्यादरम्यान पोलिसांनी पीडित महिलेचा मागोवा काढला. तिला साक्षीसाठी न्यायालयात हजर केले. मात्र, तिनेही खटल्यातील आरोपांचे समर्थन केले नाही. तिने न्यायालयाला सांगितले की, १९७७ साली ती फोर्ट येथील एका अकाउंट ऑफिसमध्ये काम करत होती. तिला १९७७ मध्ये घडलेली घटना आठवत नाही. ती आरोपीला ओळखत नाही. साक्षीदाराने सरकारी वकिलांच्या आरोपांचे समर्थन केले नाही.
परिणामी, आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे अपुरे आहेत. सरकरी वकिलांना आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात अपयश आले आहे, असे म्हणत न्यायालयाने कळेकर यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) मधील गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले. शिवाय त्यांचे वय ८४ आहे. याचाही विचार करून, अटकेनंतर काही दिवसांतच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला.