बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 18:23 IST2024-05-13T18:23:17+5:302024-05-13T18:23:55+5:30
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
Mumbai Rain News: राजधानी मुंबईतील घाटकोपर इथं एका पेट्रोल पंपावर शेजारीच असणारं लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या होर्डिंगखाली पेट्रोल पंपावर असणारी तब्बल ८० वाहने अडकल्याची माहिती आहे. तसंच यामध्ये मोठी हानी झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जवळपास ३५ जखमींना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी शहरातील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पेट्रोल पंपावर अचानक होर्डिंग कोसळताच घटनास्थळी मोठा गदारोळ उडाला. इंधन भरण्यासाठी आलेल्या गाड्या आणि पाऊस व वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी आडोशाला उभे असणारे नागरिक या होर्डिंगखाली अडकले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत.
पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलच्या टाक्या, तसेच सीएनजीच्याही टाक्या असल्याने गॅस कटरचा वापर केल्यास आग लागण्याचा धोका आहे. त्यामुळे बचावकार्याला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कोसळलेलं होर्डिंग हे बेकायदेशीर असून ते हटवण्याबाबत आम्ही वारंवार मागणी केल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.