भाजप मुंबई कार्यकारिणीत ८ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस; किरीट भन्सालींची तिसऱ्यांदा कोषाध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:10 IST2026-03-06T08:09:33+5:302026-03-06T08:10:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची घोषणा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी केली. कार्यकारिणीत ...

भाजप मुंबई कार्यकारिणीत ८ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस; किरीट भन्सालींची तिसऱ्यांदा कोषाध्यक्षपदी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची घोषणा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी केली. कार्यकारिणीत ८ उपाध्यक्ष आणि ४ सरचिटणीस नियुक्त करण्यात आले आहेत, तर तिसऱ्यांदा कोषाध्यक्षपदाची जबाबदारी किरीट भन्साली यांच्याकडे सोपविली आहे. पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी राजा यांना उपाध्यक्षांच्या यादीत स्थान मिळाले.
नव्या कार्यकारिणीत अभिजित सामंत, अमरजित मिश्रा, महेश पारकर, राजश्री पलांडे, रश्मी मिरचंदानी, रवी राजा, पंकज यादव आणि किरण शेलार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राजेश शिरवडकर, आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळकर व विनोद शेलार यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
पक्षाच्या विविध मोर्चांच्या अध्यक्षपदांवरील नियुक्त्याही साटम यांनी जाहीर केल्या. त्यानुसार दीपक सिंह (युवा मोर्चा), योजना ठोकळे (महिला मोर्चा), सन्नी सानप (ओबीसी मोर्चा), शरद कांबळे (अनुसूचित जाती मोर्चा), प्रमोद मिश्रा (उत्तर भारतीय मोर्चा), वसीम खान (अल्पसंख्याक मोर्चा) आणि धनंजय कोलकर (झोपडपट्टी मोर्चा) यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ॲड. अमित मेहता यांची मुंबई भाजप लीगल सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय विविध आघाड्या, सेल व अन्य आघाड्यांच्या संयोजकांची नियुक्त्याही जाहीर केल्या असून नव्या टीमच्या माध्यमातून मुंबईतील पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.