७९ वर्षांचे आजोबा एलएलबीच्या वर्गात; साठी पार केलेल्या १७५ जणांचे प्रवेश, कायद्याच्या शिक्षणाकडे ज्येष्ठांचाही कल वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:24 IST2025-11-15T11:23:54+5:302025-11-15T11:24:15+5:30
LLB Education: एकेकाळी तरुण वर्गाकडूनअधिक पसंतीस उतरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाकडे आता ज्येष्ठांचाही कल वाढला आहे. निवृत्तीनंतर अनेक जण या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असून, यंदा राज्यात वयाची ६० वर्षे पार केलेल्या तब्बल १७५ जणांनी एलएलबी ३ वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे.

७९ वर्षांचे आजोबा एलएलबीच्या वर्गात; साठी पार केलेल्या १७५ जणांचे प्रवेश, कायद्याच्या शिक्षणाकडे ज्येष्ठांचाही कल वाढला
- अमर शैला
मुंबई : एकेकाळी तरुण वर्गाकडूनअधिक पसंतीस उतरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाकडे आता ज्येष्ठांचाही कल वाढला आहे. निवृत्तीनंतर अनेक जण या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असून, यंदा राज्यात वयाची ६० वर्षे पार केलेल्या तब्बल १७५ जणांनी एलएलबी ३ वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. तर, मागील तीन वर्षात एकूण ५१० जण हे शिक्षण घेत आहेत. त्यात यंदा या अभ्यासक्रमाला शिकणारे सर्वात ज्येष्ठ हे ७९ वर्षाचे आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी) मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली.
नोकरी आणि व्यवसाय सांभाळून पुढील उच्च शिक्षणाचा पर्याय म्हणून अनेक जण यासाठी प्रवेश घेत आहेत. उतारवयात कामाच्या रहाटगाड्यात मागे राहून गेलेले शिक्षण पूर्ण करण्याच्या उद्देशाने अनेकजण प्रवेश घेत आहेत.
कॉलेजला दांडी, परीक्षेला हजेरी
मध्यमवयीन विद्यार्थी विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला जात असला तरी दररोज शिकवणी वर्गाना हजेरी लावली जात नाही. अनेक जण केवळ परीक्षा आणि अंतर्गत चाचणी परीक्षा यापुरतेच कॉलेजला हजेरी लावत आहेत.
मुंबईतील अनेक कॉलेजमध्ये पटावरील हजेरीच्या तुलनेत प्रत्यक्षात ३० ते ३५ टक्के विद्यार्थीच नियमित वर्गांना हजर राहत असतात, अशी माहिती एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.'
८३ वर्षांचे आजोबाही...
२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात ८३ वर्षांच्या आजोबांनी एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. त्याआधी २०२३-२४ मध्ये ७७वर्षांच्या आजोबांनी प्रवेश घेतला होता. दरम्यान, यंदा वयाची ७० आणि त्यापुढील वयाच्या ११ जणांनी यासाठी प्रवेश घेतला आहे. यंदा एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाला २२,९११ जणांनी प्रवेश घेतले. त्यात २३ वयोगटापर्यंतचे ५,३६६ जण आहेत. त्याचवेळी ३० वर्षे पार केलेल्या ११,२८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
कायदा शिकण्यासाठी कोणत्याही ठरावीक वयाची गरज नाही. आज वर्गात २० वर्षांचा तरुण आणि ८० वर्षांचा विद्यार्थी एका प्रकरणावर चर्चा करताना दिसतो. हे दोघेही एकमेकांकडून शिकतात. हा बदललेला कल म्हणजे लोकांच्या विचारात झालेला आमूलाग्र बदल आहे.
- साजन पाटील, प्राचार्य, रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे