७२ हजार प्रतितोळा, तरी १० टन सोन्याची ‘अक्षय्य’ खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:00 AM2024-05-11T09:00:06+5:302024-05-11T09:00:35+5:30

मे महिन्यातील लग्नसराईमुळे सोन्या-चांदीची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषत: सोन्याचे दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे.

72,000 per tola, but the purchase of 10 tonnes of gold is 'imperishable' on Akshay Tritiya | ७२ हजार प्रतितोळा, तरी १० टन सोन्याची ‘अक्षय्य’ खरेदी

७२ हजार प्रतितोळा, तरी १० टन सोन्याची ‘अक्षय्य’ खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोने प्रतितोळा ७२ हजार रुपये असूनही शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांनी दागिन्यांची जोरदार खरेदी केल्याची माहिती सराफांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करता मुहूर्तावर १० टनांपेक्षा अधिक सोने विकले गेले, अशी माहिती त्यांनी दिली.

मे महिन्यातील लग्नसराईमुळे सोन्या-चांदीची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषत: सोन्याचे दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. सोन्याच्या बांगड्या, हार या अलंकारांची खरेदी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी अधिक करण्यात आली. बहुतांशी महिलांकडून सोन्याचे मणी, सोन्याची नाणी यांची खरेदी केल्याचे पाहायला मिळाले. 

गुढीपाडव्याच्या तुलनेत अक्षय्य तृतीयेला दुप्पट खरेदी होत आहे. पाडव्यापेक्षा तीन ते साडेतीन हजार भाव जास्त आहे. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. आजच्या मुहूर्तावर चांगली खरेदी-विक्री झाली आहे. साधारण मुंबई, महाराष्ट्रात १०० टन सोन्याची खरेदी-विक्री होईल, असा अंदाज आहे. दागिन्यांची खरेदी जास्त झाली आहे.
- आनंद पेडणेकर, सराफ

सोने ७२ हजार रुपये प्रतितोळा होते. सोन्याची नाणी, चांदीची मूर्ती आणि पैंजण, सोनसाखळीची विक्री चांगली झाली. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे १० टन सोने विकले गेले.    - निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते  

किमती वाढलेल्या असल्या तरी ग्राहकांचा प्रतिसाद कमी न होता गुढीपाडव्याइतकाच आहे. जडशीळ दागिने, बुलियन आणि नाण्यांना मागणी कायम आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांना चांगला प्रतिसाद आहे.
- डॉ. सौरभ गाडगीळ, सराफ

झवेरी बाजारात खरेदी-विक्रीसाठी दाखल ग्राहकांची संख्या मोठी होती. लग्नसराईमुळे गर्दी जास्त होती. दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार अधिक आहेत.    - कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन

गेल्या १० दिवसांपासून ग्राहक दागिन्यांची आगाऊ बुकिंग करत आहेत. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या केवळ एका दिवसात २०-२२ टन सोन्याची डिलिव्हरी होईल, असा अंदाज आहे.
- सय्यम मेहरा, अध्यक्ष, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल

Web Title: 72,000 per tola, but the purchase of 10 tonnes of gold is 'imperishable' on Akshay Tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.