मेट्रो ९ मार्गिकेवर उभारला ७०० मेट्रिक टनाचा गर्डर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:28 IST2025-06-14T13:28:44+5:302025-06-14T13:28:59+5:30
Metro 9 Line: दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात मेट्रो गाड्यांच्या ट्रायल रनला सुरुवात झाल्यावर आता दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही एमएमआरडीएने गती दिली आहे.

मेट्रो ९ मार्गिकेवर उभारला ७०० मेट्रिक टनाचा गर्डर
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात मेट्रो गाड्यांच्या ट्रायल रनला सुरुवात झाल्यावर आता दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही एमएमआरडीएने गती दिली आहे. या मेट्रो मार्गिकेवर पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर येथे सुमारे ७०० मेट्रिक टन वजनाचा आणि ६५ मीटर लांबीच्या स्टील गर्डरची एमएमआरडीएने उभारणी पूर्ण केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मेट्रो मार्गिकेची लांबी १०.५४ किमी असून त्यावर ८ स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव हा ४.४ किलोमीटरचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. डिसेंबरपूर्वी ही मेट्रो सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्याची ९५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
दोन क्रेन्सचा प्रत्यक्ष वापर
एमएमआरडीएने ७ ते ११ जूनदरम्यान भाईंदर पश्चिम येथे तीन भागात पश्चिम रेल्वे मार्गिकेवर गर्डरची उभारणी केली. त्यातील प्रत्येक भागाचे वजन २३५ मेट्रिक टन एवढे होते.
या गर्डरची अतिशय आव्हानात्मक आणि दाट लोकवस्तीच्या भागात उभारणी करण्यात आली. त्यासाठी ६०० मेट्रिक टन आणि ७५० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेन्स वापरण्यात आल्या. तर ६०० मेट्रिक टन वजनाची अन्य एक क्रेन राखीव ठेवण्यात आली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.