७० टक्के रुग्ण उत्तुंग इमारतींमधील रहिवासी; पश्चिम उपनगरात इमारती होणार सील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 01:20 AM2020-07-25T01:20:18+5:302020-07-25T01:20:34+5:30

पालिकेने घेतला निर्णय

70% of patients live in tall buildings; Buildings in the western suburbs will be sealed | ७० टक्के रुग्ण उत्तुंग इमारतींमधील रहिवासी; पश्चिम उपनगरात इमारती होणार सील

७० टक्के रुग्ण उत्तुंग इमारतींमधील रहिवासी; पश्चिम उपनगरात इमारती होणार सील

Next

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या विभागात इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या विभागात दररोज नोंद होणाऱ्या बाधित रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांचे प्रमाण २० वरून ४० टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे एक बाधित रुग्ण सापडल्यास पूर्वी प्रमाणेच संपूर्ण इमारत सील करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय १८ मे रोजी बदलण्यात आला होता. मात्र पश्चिम उपनगरात गेल्या काही दिवसांमध्ये झोपडपट्ट्यांऐवजी इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. येथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये लक्षणे नसल्याने ते कामानिमित्त बाहेर गेल्यास अन्य लोकांमध्ये संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

गुरुवारपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यानुसार १४ दिवस बाधित इमारतींमधील सर्व रहिवाशांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच बाहेरील व्यक्तींना इमारतीच्या परिसरात प्रवेश मिळणार नाही. मात्र आसपासच्या अत्यावश्यक सेवा व अन्य दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या रहिवाशांना किराणा माल अथवा त्यांना हव्या असलेल्या वस्तू दुकानातून मागविता येतील.

कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. मात्र आता आवश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे सील केलेल्या इमारतीमधील रहिवाशांना आपले सामान घरी मागविता येणार आहे. संबंधित इमारतींच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त, आर उत्तर (दहिसर, बोरीवली)

Web Title: 70% of patients live in tall buildings; Buildings in the western suburbs will be sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.