- मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गजबजलेल्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री अवघ्या १५ सेकंदांत होत्याचे नव्हते झाले. कुर्ला डेपोतून नेहमीप्रमाणे बाहेर पडलेल्या इलेक्ट्रिक बस चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर पाय पडला. गाडीने एकदम ७० चा स्पीड घेत थेट ७ जणांचा बळी घेतला. आधीच अरुंद वाट त्यात दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार, डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर पहिल्याच स्पीड ब्रेकवर चालक संजय मोरे यांचा ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडीने एकदम ६० ते ७०चा स्पीड घेतला. वाहकाने बस थांबविण्यासाठी घंटीही वाजवली, मात्र मोरे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थांबविणे शक्य झाले नाही. भाजी मार्केटच्या बस थांब्याकडून समोर येणाऱ्यांना वाचविण्यासाठी मोरेने दुसऱ्या मार्गावरून बस फिरवली. तेथे उभ्या पोलिस वाहनाला धडकून बस पुन्हा मूळ मार्गावर आली. तेथून बसने आणखीन वेग घेत वाटेत येणाऱ्या वाहनांसह माणसांना चिरडत वाऱ्याच्या वेगाने दोनशे ते अडीशे मीटर अंतरानंतर बस आंबेडकर नगरच्या कमानीला धडकली.
अवघ्या १५ सेकंदांत वाहनाखाली, तसेच धडकेत ४९ जण जखमी होत सात जणांचा बळी गेला, तर काही जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या अपघातात चार पोलिसही जखमी झाले आहेत. समोरून येणाऱ्यांना वाचविण्याच्या नादात दोन्ही मार्गांवरून बसने वेडीवाकडी वळणे घेतल्याने गोंधळात भर पडली.
बसच्या काचा फोडून प्रवासी काढले बाहेर अपघातग्रस्त बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. या घटनेने प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरला. डोळ्यादेखत सुरू असलेल्या मृत्यूच्या थरारक प्रवासाने प्रवाशांकडून बस थांबविण्यासाठी धडपड सुरू होती. बस आंबेडकर कमानीला धडकताच बसचा दरवाजा लॉक झाला. तेव्हा मोरे यांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.