काँग्रेसच्या कार्यकारिणीत ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:54 IST2025-07-31T11:54:57+5:302025-07-31T11:54:57+5:30

कार्यकारिणीत भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

66 percent new faces get chance in congress executive | काँग्रेसच्या कार्यकारिणीत ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

काँग्रेसच्या कार्यकारिणीत ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने  मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. ३८७ जणांच्या कार्यकारिणीत पक्षाने नव्या-जुन्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत समन्वय साधला आहे. या कार्यकारिणीत ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर ३३ टक्के ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. यात ४४ टक्के ओबीसी, १९ टक्के एससी - एसटी, तर ३३ टक्के महिलांना संधी देण्यात आली आहे. कार्यकारिणीत भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

नियुक्त्यांबरोबरच काँग्रेसने महाराष्ट्रासाठी राजकीय व्यवहार समिती (पीएसी) स्थापन केली आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमिन पटेल, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, डॉ. विजय दर्डा आदींचा समावेश आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रासाठी १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, १०८ सरचिटणीस, ९५ सचिव व अन्य अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पक्षाने ८७ सदस्यीय कार्यकारिणीची स्थापना केली असून, काही जिल्हाध्यक्षांच्याही नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी अनंत गाडगीळ, अतुल लोंढे, माजी आमदार धीरज देशमुख, गोपाळ तिवारी आणि सचिन सावंत यांच्यावर सोपवण्यात आली  आहे. माध्यम समन्वयक म्हणून श्रीनिवास बिक्कड यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने पक्ष संघटनात्मक १३ जिल्ह्यात नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्तीही घोषित केली आहे.

 

Web Title: 66 percent new faces get chance in congress executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.