राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार; एनसीआरबी अहवालात धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:49 IST2025-10-27T12:49:11+5:302025-10-27T12:49:40+5:30
लहान मुलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार; एनसीआरबी अहवालात धक्कादायक माहिती
मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार राज्यात दररोज सरासरी ६१ बालकांवर अत्याचार होत असून, त्यापैकी २४ बालकांवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
२०२३ मध्ये राज्यात बालकांवरील अत्याचाराचे एकूण २२ हजार ३९० गुन्हे नोंदवले गेले होते. २०२२ च्या तुलनेत ते एक हजार ६२८ ने अधिक आहेत. संपूर्ण देशात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा वाटा सुमारे १३ टक्के आहे. गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश २२ हजार ३९३ गुन्ह्यांसह प्रथम, तर महाराष्ट्र २२ हजार ३९० गुन्ह्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दर लाख बालकांमागील गुन्ह्यांचा दर लक्षात घेतल्यास महाराष्ट्र देशात दहाव्या स्थानी असून, येथे दर लाख बालकांमागे ६१ गुन्हे नोंदले गेले आहेत. सर्वाधिक गुन्ह्यांचा दर अंदमान आणि निकोबार बेटे (१४३.४), दिल्ली (१४०.३), चंदीगड (९०.७), आसाम (८४.२) आणि मध्य प्रदेश (७७.९) मध्ये आहे.
क्राय संस्थेच्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक बालकांवरील गुन्ह्यांनुसार मुंबईत जिल्ह्यात (३,११०), ठाण्यात (१,६३८), पुण्यात (१,२३४), मीरा-भाईंदरमध्ये (१,०१६) आणि पुणे ग्रामीण (८७८) जिल्ह्यांमध्ये नोंदले गेले आहेत.
लहान मुलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अपहरणांचे प्रमाण अधिक
राज्यातील गुन्ह्यांमध्ये १२ हजारांहून अधिक गुन्हे अपहरणाशी संबंधित आहेत.
त्याचबरोबर, आठ हजारांहून अधिक गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत, ज्यात मुंबईत १,११०, ठाणे ४४७, पुणे ४३१, पुणे ग्रामीण ४०० आणि मीरा भाईंदर-वसई विरारमध्ये ३३३ गुन्हे नोंदले गेले आहेत.