बांधकामाधीन इमारतीवरून ६ मजूर कोसळले; एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 06:38 IST2026-03-01T06:37:42+5:302026-03-01T06:38:03+5:30
पाच जखमींपैकी एक गंभीर; कंत्राटदारावर कारवाईचे महापौरांचे आदेश

बांधकामाधीन इमारतीवरून ६ मजूर कोसळले; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चेंबूरच्या सुभाष नगरमधील ३६ क्रमांकाच्या बांधकामाधीन इमारतीवरून शनिवारी दुपारी सहा मजूर कोसळले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर उर्वरित पाच जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती यंत्रणांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस तसेच संबंधित प्रभागांतील महापालिका कर्मचारी तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाले. जखमी मजुरांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत रामल्लू (५५) या मजुराचा मृत्यू झाला. तर गुंधधर राय (२२) याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अन्य जखमी मजूर उसराई (३०), रमेश राय (२५), विजय (३५) आणि संदीप (२७) यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत.
हा अपघात नेमका कशामुळे घडला? याची चौकशी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : महापौर तावडे
चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील दुर्घटना स्थळी महापौर रितू तावडे यांनी भेट दिली. त्यानंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूस केली. यावेळी उप महापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर उपस्थित होते.
बेजबाबदारपणे काम करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई करावी, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अशा घटना होऊ नयेत यासाठी महानगरपालिका व म्हाडा प्राधिकरणाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर तावडे यांनी दिले.
पुलावरून सळई पडली; तरुण जखमी
मुंबई : शिवडी-वरळी पुलावरून शुक्रवारी रात्री एक सळई अंगावर पडल्याने २२ वर्षीय तरुण जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गणेश विष्णू बुधाले (२२) असे त्याचे नाव आहे.
आचार्य दोंदे मार्ग परिसरातून हा तरुण जात होता. स्थानिकांनी त्याला ग्लेनीगल्स रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी एमएमआरडीएने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार स्टप आणि कंत्राटदार जे कुमार प्राेजेक्टस या दाेघांना कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे.