CoronaVirus News: एकाच दिवसात ५११ पोलीस कोरोनाबाधित; ७ जणांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 06:44 IST2020-09-07T02:13:04+5:302020-09-07T06:44:49+5:30
आतापर्यंत १७३ मृत्यू

CoronaVirus News: एकाच दिवसात ५११ पोलीस कोरोनाबाधित; ७ जणांनी गमावला जीव
मुंबई : अनलॉकच्या काळात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे चित्र असून पोलिसही याचे शिकार होत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यभरात तब्बल ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंतचा बाधित पोलिसांचा हा सर्वाधिक दैनंदिन आकडा आहे. तर याच कालावधीत ७ पोलिसांना जीव गमवावा लागल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १७३ वर गेला आहे.
राज्यभरात १ हजार ८१८ पोलीस अधिकाऱ्यांसह १५ हजार ९४ पोलीस कर्मचारी अशा एकूण १६ हजार ९१२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी १,४२१ अधिकारी आणि १२,२९८ कर्मचारी मिळून १३ हजार ७१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ हजार २० पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत ज्या ७ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा येथील प्रत्येकी १ तर नागपूर शहरमधील २ पोलिसांचा समावेश आहे.