बोरिवलीमध्ये एका दिवसात ५ हजार फुकटे प्रवासी; १३.५ लाखांचा रुपयांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:27 IST2025-08-07T11:26:45+5:302025-08-07T11:27:05+5:30
नियमित विशेष मोहिमेमध्ये ५० टीसी असतात. परंतु नमस्ते तिकीट तपासणी अभियानासाठी ३५० टीसी आणि इतर कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

बोरिवलीमध्ये एका दिवसात ५ हजार फुकटे प्रवासी; १३.५ लाखांचा रुपयांचा दंड वसूल
मुंबई : पश्चिम रेल्वेने नमस्ते नावाचे अभियान सुरू केले असून या माध्यमातून ३०० टीसींची फौज तयार केली आहे. बोरिवली स्टेशनमधून या मोहिमेची बुधवारी सुरुवात झाली असून, या स्टेशनवर एका दिवसात ५ हजार १९२ विनातिकीट प्रवासी पकडले. त्यांच्याकडून १३.५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासाठी रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रोटेक्टिव फोर्सच्या जवानांची देखील मदत घेण्यात येत आहे. रेल्वेच्या इतिहासामधली सर्वात मोठी तिकीट तपासणी मोहीम पश्चिम रेल्वेने सुरू केली आहे. यासाठी मोठी फौज तयार केली.
विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेचा महसूल तर बुडतोच, परंतु नियमित प्रवाशांवर देखील अन्याय होतो. यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. रोज कोणत्याही उपनगरीय स्टेशनवर ही मोहीम राबविणार असल्याने प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करावा.
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
नियमित विशेष मोहिमेमध्ये ५० टीसी असतात. परंतु नमस्ते तिकीट तपासणी अभियानासाठी ३५० टीसी आणि इतर कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
टीसींसाठी विशेष जॅकेट
तिकीट तपासणी दरम्यान टीसींवर काही प्रवाशांकडून हल्ले होण्याचे प्रकार घडतात. यामध्ये टीसीच्या जिवाला धोका संभवतो. नुकतेच बोरिवली स्टेशनमध्ये असा प्रकार घडला असून, एका फुकट्या प्रवाशाने टीसीला मारहाण करत ऑफिसमधल्या सामानाची तोडफोड केली होती.
रेल्वेने टीसीला विशेष काळ्या रंगाचे जॅकेट दिले आहे. हे जॅकेट जाड कपड्यापासून बनवले असून त्यामध्ये ६ खिसे आहेत. त्या जॅकेटला बॉडी कॅमेरे सुविधा देण्यात आली आहे. परिणामी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा पुरावादेखील मिळवता येणार असून टीसीचे संरक्षण देखील होणार असल्याचे अधिकारी म्हणाले.