chinese manja: चायनीज मांजामुळे ५०० पक्ष्यांचे पंख कापले; मालाड, दहिसर पट्ट्यामध्ये सर्वाधिक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 16:20 IST2026-02-01T16:18:03+5:302026-02-01T16:20:20+5:30
मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार व काचेचा लेप असलेल्या मांजामुळे यंदाही मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी झाले.

chinese manja: चायनीज मांजामुळे ५०० पक्ष्यांचे पंख कापले; मालाड, दहिसर पट्ट्यामध्ये सर्वाधिक घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार व काचेचा लेप असलेल्या मांजामुळे यंदाही मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी झाले. हजारो पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला. मुंबईभर विविध स्वयंसेवी संस्था व मंडळांद्वारे २० हून अधिक 'फ्री बर्ड मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आले होते. या कॅम्पमधून संपूर्ण मुंबईत ५०० पेक्षा अधिक जखमी पक्ष्यांचे रेस्क्यू करण्यात आले.
एनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे मानद पशू कल्याण प्रतिनिधी आणि करुणा ट्रस्ट, विरारचे ट्रस्टी मितेश जैन २० वर्षांपासून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने 'फ्री बर्ड मेडिकल कॅम्प' आयोजित करत आहेत. यंदा करुणा ट्रस्ट, विरारच्या वतीने आयोजित कॅम्पमध्ये ११ पक्ष्यांचे रेस्क्यू केले. यात कबुतरे, एका कावळ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकाला उपचारानंतर आकाशात सोडण्यात आले.
संस्थेकडून ३०० हून अधिक रेस्क्यू
दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि मालाड या भागांमध्ये सर्वाधिक घटना घडल्या असून या परिसरातच ३०० हून अधिक पक्ष्यांचे रेस्क्यू केल्याचे जैन यांनी सांगितले. ही संख्या इथेच थांबत नसून खरी परीक्षा मकरसंक्रांतीनंतर सुरू होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मकरसंक्रांतीनंतर वर्षभर मदतीसाठी फोन
मकरसंक्रांतीनंतरही वर्षभर फायर ब्रिगेड आणि स्वयंसेवी संस्थांना पक्षी अडकण्याचे कॉल येत राहतात. अनेक वेळा पक्षी मृत अवस्थेत आढळतात किंवा गंभीर जखमी होतात. काही पक्षी आयुष्यभर उड्डू शकत नाहीत आणि त्यांना कायमस्वरूपी आश्रयगृहात ठेवावे लागते, असे मितेश जैन यांनी सांगितले.
प्रतिबंधित चायनिज मांजाची सर्रास विक्री
प्रतिबंधित चायनीज मांजाची अनेक ठिकाणी सर्रास विक्री होत असल्याने पक्षीप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या मांजामुळे पक्ष्यांसोबतच अनेक नागरिकही जखमी होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. स्वयंसेवी संस्थांनी राबवलेल्या जनजागृती मोहिमांमुळे परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. पूर्वी जखमी पक्ष्यांची संख्या अधिक होती. आता लोकांमध्ये जागरूकता झाली आहे.