Join us
Daily Top 2Weekly Top 5

50 वर्षीय महिलेवर बलात्कार, पोलिसांकडून तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 22:25 IST

टिटवाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

उमेश जाधव

टिटवाळा : टिटवाळा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मानवली व रायता गावा जवळील आसाराम बापू यांच्या आश्रमात सेवा धर्म करून पन्नास वर्षे वयस्कर महिला 23 जून 2019 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास उल्हासनगर येथे आपल्या घरी एकटीच पायी जाण्यास निघाली होती. रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास ही महीला मुरबाड-कल्याण रोडने पाचवा मैल कांबा गावच्या हद्दीतून निर्जन ठिकाणाहून उल्हासनगरकडे जात असतांना एका पंचवीस ते तीस वर्षे वयाच्या अनोळखी तरूणाने सदर महिलेचा हात पकडून ओढत नेत, झुडपातील नाल्यात नेऊन, धमकावून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून पळ काढला होता. सदर महिलेने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या तक्रारी वरून 25 सप्टेंबर रोजी कल्याण तालुका, टिटवाळा पोलीस ठाण्यात 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिक्षक डॉक्टर शिवाजी राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक संजय कुमार पाटील तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी मुरबाड यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची खास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरू केला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपी तरुणा बाबत कुठल्या प्रकारची माहिती उपलब्ध नसताना केवळ तक्रारदार महिलेने दिलेल्या त्रोटक माहितीच्या आधारे पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आसाराम बापू यांच्या राहता येथील आश्रमापासून घटनास्थळ पर्यंतच्या परिसराची बारकाईने पाहणी करून तपास सुरू केला. त्याच प्रमाणे रोड लागते सर्व सीसीटीव्ही फुटेज ची  देखील पडताळणी केली. तसेच या परिसरातील घटनास्थळा लगते रहिवाशी हॉटेल धाबे चालत झोपडपट्टी कामगार वस्ती खदान कामगार यांच्याकडून घटनेच्या वेळी आलेल्या- गेलेल्या लोकांची व संशयितांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे लखन सोमनाथ देवकर(29) असे सदरच्या इसम नाव असून तो मुळचा उपळा, उस्मानाबाद येथील रहिवासी असून सध्या तो पाचवा मैल येथे राहणारा असल्यास निष्पण झाले. सदरचे कृत्य करून तो आळेफाटा, तालुका जुन्नर, पुणे येथे पळाला होता. तेथून  टिटवाळा पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेच्या वेळी फिर्यादी महिलेने आरोपीच्या छातीवर घेतलेल्या चाव्याच्या खुणा देखील आढळून आल्या आहेत. 

कुठल्याही प्रकारचा धागादोरा उपलब्ध नसतांना देखील कल्याण तालुका टिटवाळा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील उपविभागीय अधिकारी मुरबाड बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका, टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती वानखेडे, बजरंग राजपूत, प्रदीप आरोटे, विजय सूर्वे, किशोर धायगुडे, कमलाकर मुंडे, प्राची पांगे, एएसआय ओ. डी. पाटील, पो.ना. दर्शन सावळे, तुषार पाटील, नितीन विशे, भारत आहिरे, संदीप आहिरे, पो. शि. सोमनाथ भांगरे, योगेश वाघेरे, निकेश मांडोळे, चालक घोडे आणि कर्मचारी यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती वानखेडे या करत आहेत.

 

टॅग्स :बलात्कारमुंबईनवी मुंबईगुन्हेगारीपोलिस