पॉलिटेक्निकसाठी पहिल्या फेरीतच ४९ हजार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 09:07 IST2025-07-19T09:06:43+5:302025-07-19T09:07:08+5:30
राज्यातून अंतिम गुणवत्तायादीत यंदा १ लाख ४० हजार २८६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत, जी मागील वर्षाच्या तुलनेत १२ हजारांहून अधिक वाढ आहे.

पॉलिटेक्निकसाठी पहिल्या फेरीतच ४९ हजार प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने सन २०२५-२६ साठी ‘एसएससी’नंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीचा निष्कर्ष जाहीर केला आहे. पहिल्या फेरीतच ४९ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. यंदा एकूण ४०४ संस्था (पॉलिटेक्निक- ३८४, आर्किटेक्चर- २०) प्रवेशप्रक्रियेत सहभागी झाल्या असून, मागील वर्षी या संस्था ३९४ होत्या. एकूण प्रवेश क्षमता १ लाख २० हजार ५७४ इतकी आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत ७ हजाराहून अधिक आहे.
राज्यातून अंतिम गुणवत्तायादीत यंदा १ लाख ४० हजार २८६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत, जी मागील वर्षाच्या तुलनेत १२ हजारांहून अधिक वाढ आहे. यापैकी १ लाख १८ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी पर्याय भरणा अर्ज सादर केला, म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास १३ हजार अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. पहिल्या प्रवेश फेरीत ८१ हजार ८३० विद्यार्थ्यांना जागा मिळाली असून, त्यातील ३९ हजार २९६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीची जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे यंदा ४८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संबंधित संस्थेत जाऊन आपला प्रवेश निश्चित केला आहे.
राज्यभरात प्रवेशप्रक्रियेत वाढ
राज्यातील पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रियेत उत्साहवर्धक वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गुणवत्तायादी, पर्याय अर्ज सादर आणि प्रवेश निश्चित करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल तांत्रिक शिक्षणाकडे वळत असल्याचे स्पष्ट होते.
प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर
१७ ते १९ जुलैदरम्यान पर्याय अर्जात करता येईल फेरबदल
२२ ते २४ जुलैदरम्यान दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी संस्थेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.