Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 05:31 IST

प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना 'पोलिस पदक' जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्तमहाराष्ट्रपोलिस दलातील ४९ पोलिसांचा गौरव होणार आहे. यात मुंबई पोलिस दलाचे सह पोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांच्यासह नागपूरचे सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पुण्यातील सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती पोलिस पदक' जाहीर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र पोलिस दलातील सात पोलिसांना शौर्य पदके, तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना 'पोलिस पदक' जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर महाका, हेडकॉन्स्टेबल मनोहर पेंडम, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश कन्नाके, अतुल येगोळपवार, हिदायत खान यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे, तर पोलिस कॉन्स्टेबल सुरेश तेलमी यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कार्याचा ठसा उमटविणारे अधिकारी

मुंबईत वाहतूक विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेले आयपीएस अनिल कुंभारे यांनी नागपूर विद्यापीठातून एम.एस्सी (केमिस्ट्री) शिक्षण घेतले. त्यांनी १९९३ पासून पोलिस सेवेला सुरुवात केली. भंडारा, गडचिरोली, नाशिक, नागपूर, मालेगावमध्ये उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर २००६ ते २०१० दरम्यान त्यांनी पुणे शहरात उपायुक्त म्हणून सेवा बजावली.

दोन वर्ष मुंबई पोलिस दलात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या परिमंडळ २ची जबाबदारी त्यांच्यावर होती. ठाणे, औरंगाबादमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून धडाकेबाज कामगिरी बरोबर कोरोना काळात ठाण्यात अपर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. पुढे, मुंबई पोलिस दलात मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त, दहशतवाद विरोधी विभागाचे महानिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर वाहतूक विभागाची धुरा त्यांच्या हाती सोपविली. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मान 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त दत्तात्रय ढोले, शैलेंद्र धिवार, ज्योती देसाई तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश जाधव, रवींद्र वाणी तसेच पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, यशवंत मोरे आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र कोंडे यांना पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहे.

पोलिस पदके जाहीर झालेल्या राज्यातील अन्य पोलिस अधिकाऱ्यांत उपअधीक्षक संजय चंदखेडे, बाळासाहेब भलचीम, राजन माने, कैलास पुंडकर, नरेंद्र हिवरे, सत्यवान माशाळकर, आंचल मुदगल, ओहरसिंग पटले, विश्वास पाटील, दीपककुमार वाघमारे, अनिल ब्राह्मणकर, जोसेफ डिसिल्वा यांच्यासह ३९ जणांचा समावेश आहे.

ऑपरेशन सिंदूरमधील ७० जवानांचाही गौरव

पाकिस्तानविरोधातील 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान असामान्य धैर्य दाखविणाऱ्या सशस्त्र दलाच्या ७० जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले. यात हवाई दलाच्या ३६ जवानांचा समावेश असून ९ अधिकाऱ्यांना वीर चक्र जाहीर झाले आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या १६ जवानांनाही शौर्य पुरस्काराने गौरविले आहे. यात एक डेप्युटी कमांडंट रैंक अधिकारी, दोन असिस्टंट कमांडंट व एक इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रपोलिसस्वातंत्र्य दिन