स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने ४६ लाखांचा गंडा, इस्टेट एजंटसह दोघांवर अंबोलीत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:09 IST2025-11-12T14:08:53+5:302025-11-12T14:09:30+5:30
Crime News: मालाड पूर्वेकडील परिसरात फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवत इस्टेट एजंट आणि त्याच्या साथीदाराने महेश साटम (५४) यांना ४६ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी साटम यांच्या तक्रारीवरून इस्टेट एजंट राज पंडित आणि त्याचा साथीदार सुदेश मोरे यांच्याविरोधात अंबोली पोलिसांनी १० नोव्हेंबरला गुन्हा नोंदवला आहे.

स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने ४६ लाखांचा गंडा, इस्टेट एजंटसह दोघांवर अंबोलीत गुन्हा
मुंबई - मालाड पूर्वेकडील परिसरात फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवत इस्टेट एजंट आणि त्याच्या साथीदाराने महेश साटम (५४) यांना ४६ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी साटम यांच्या तक्रारीवरून इस्टेट एजंट राज पंडित आणि त्याचा साथीदार सुदेश मोरे यांच्याविरोधात अंबोली पोलिसांनी १० नोव्हेंबरला गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार महेश साटम हे ओशिवरा परिसरात साइट सुपरवायझर आहेत. राज पंडित याने त्यांना मालाड पूर्वेतील गोविंदनगर येथे ५५ लाख रुपयांत फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. साटम यांनी फ्लॅट पाहण्यास होकार दिला आणि पंडितसोबत फ्लॅटचा मालक म्हणवणाऱ्या मोरे यांना भेटले.
मोरे याने सांगितले की ते ‘शिवशक्ती डेव्हलपर्स’ या नावाने काम करणाऱ्या देवेंद्र पांडे यांच्याकडे फ्लॅट विक्रीचे काम करतात तसेच स्वतःची ‘पृथ्वी डेव्हलपर्स’ नावाची कंपनी चालवतात. त्यांनी सांगितलेला फ्लॅट त्यांच्या मालकीचा असून पार्किंगसह ५५ लाखांत विकला जाईल. पंडित याने साटम यांना पाच लाख रुपये टोकन रक्कम म्हणून मोरे याच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त केले.
५० लाख रुपये भरल्यानंतर ॲग्रिमेंट
पंडित याने पुढे सांगितले की, ५० लाख रुपये भरल्यानंतरच घरासाठी रजिस्ट्रेशन आणि सेल ॲग्रिमेंट होईल. त्यामुळे साटम यांनी त्यानुसार मोरेच्या नावाने चेक दिला.
बँक खात्यातून पैसे वळते
१९ सप्टेंबर २०२४ रोजी पंडित याने व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या सेल ॲग्रिमेंटमध्ये फ्लॅटच्या मालकांची नावे प्रफुल्ल आणि प्रेरणा शिंदे असल्याचे दिसले. विचारणा केली असता, हा फ्लॅट शिंदे यांच्या मालकीचा असून मोरे त्यांच्याकडून खरेदी करून साटम यांना विकणार असल्याचे सांगण्यात आले.
ॲग्रिमेंटवर ‘पृथ्वी डेव्हलपर्स’चे नाव असल्याने साटम यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, साटम यांनी हे ॲग्रिमेंट ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना दाखवले असता त्यांनी हे ॲग्रिमेंट चुकीचे आहे, त्वरित पेमेंट स्टॉप करा, असा सल्ला दिला; परंतु त्याच दिवशी साटम यांच्या कॅनरा बँक खात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेश आला.