शुभ मंगल सावधान ! नोंदणी कार्यालयांमध्ये ४,५९४ विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:33 IST2025-10-11T10:32:48+5:302025-10-11T10:33:08+5:30
सप्टेंबरमध्ये पितृपक्ष असल्याने विवाह नोंदणीचे प्रमाण खालावले होते. आता तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्त असल्याने नोंदणी पद्धतीने होणाऱ्या विवाहांचे प्रमाण वाढेल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा विवाह अधिकारी नीता नागपुरे यांनी दिली.

शुभ मंगल सावधान ! नोंदणी कार्यालयांमध्ये ४,५९४ विवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर, जिल्हा व उपनगर जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात गेल्या नऊ महिन्यांत नोंदणी पद्धतीने चार हजार ५९४ विवाह पार पडले. त्यापैकी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान मुंबई शहर जिल्ह्यात एक हजार ७३, तर उपनगर जिल्ह्यात तीन हजार ५२१ विवाह पार पडले.
सप्टेंबरमध्ये पितृपक्ष असल्याने विवाह नोंदणीचे प्रमाण खालावले होते. आता तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्त असल्याने नोंदणी पद्धतीने होणाऱ्या विवाहांचे प्रमाण वाढेल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा विवाह अधिकारी नीता नागपुरे यांनी दिली.
फेब्रुवारीत दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक विवाह झाले आहेत. प्रेमाचा दिवस असलेल्या १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाइन डेनिमित्त अनेकजण विवाहाचा मुहूर्त साधतात, असे त्यांनी सांगितले. विवाहाची नोटीस देताना १५० रुपये व विवाहावेळी नोंदणी शुल्क १५० रुपये, अशा प्रकारे एका विवाहासाठी ३०० रुपये सरकारच्या तिजोरीत शुल्क रूपाने जमा होतात.
जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांमध्ये सर्वात जास्त विवाह फेब्रुवारीमध्ये झाले आहेत. दिवाळी व तुळशी विवाहानंतर विवाहाचे अनेक मुहूर्त असल्याने विवाहाच्या संख्येत दुपटीने वाढ होते. गणेशोत्सव व इतर वेळी अनेकजण गावी जातात त्यामुळे हे प्रमाण खालावते.
- संतोष भातंबरेकर, विवाह अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा