हक्काचे पैसे स्वर्गवासी झाल्यावर देणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बेस्टला सवाल, तीन वर्षांपासून देणी थकली
By सीमा महांगडे | Updated: November 4, 2025 15:18 IST2025-11-04T15:15:24+5:302025-11-04T15:18:16+5:30
तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांची देणी थकली

हक्काचे पैसे स्वर्गवासी झाल्यावर देणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बेस्टला सवाल, तीन वर्षांपासून देणी थकली
सीमा महांगडे
मुंबई:बेस्टच्या ४ हजार ५०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी आणि रजेचे रोखीकरण यासह अन्य देणी गेल्या तीन वर्षांपासून मिळालेली नाहीत. ही देणी तब्बल ७०० कोटी रुपयांहून अधिक असून प्रत्येक कर्मचाऱ्याला लाखो रुपये येणे आहेत. त्यातीलच एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी बेस्ट उपक्रमाचे मुख्यालय असलेल्या बेस्ट भवन बाहेर एक अनोखे आंदोलन केले. सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युईटी, अंतिम देयके व कोविड काळातील भत्ता यापैकी एकही पैसा अद्याप न मिळाल्यामुळे आता ही थकबाकी स्वर्गवासी झाल्यावर देणार का असा सवाल उपस्थित करणारा फलक हातात घेऊन त्यांनी बेस्ट उपक्रमाला आणि शासनाला जाब विचारला आहे.
खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे, या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने २०१९ पासून भाडेतत्त्वावरील बसगाड्या दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र, विविध प्रयोग करूनही बेस्टच्या परिवहन विभागाचे ना उत्पन्न वाढले, ना तोटा कमी झाला. २०१९ मध्ये मुंबई महापालिका, बेस्ट उपक्रम आणि बेस्ट कामगार संघटनांमध्ये सामंजस्य करार झाला. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना होत्या. हा करार संपुष्टात आल्यानंतर नव्याने करार झालाच नाही. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १५० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होऊ लागला. असे असतानाही महापालिकेकडून बेस्टला अनुदानापोटी दर महिन्याला काही ठरावीक रक्कम मिळू लागली. मात्र, ही रक्कम खूपच कमी असल्याने ऑगस्ट, २०२२ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्यात अडथळे येऊ लागले. तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा विचार बेस्ट उपक्रमाकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे उतारवयाकडे झुकलेले सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल झाले आहेत. याच कर्मचाऱ्यांपैकी एक असलेले दीपक जुवाटकर यांनी मंगळवारी हातात फलक घेऊन बेस्ट भवनच्या बाहेर बेस्ट स्थानकाजवळ एकट्यानेच धरणे धरले. अखेर पोलिसांनी त्यांना स्थानकात बोलावून या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही, त्यासाठी आझाद मैदानात जावे लागेल, असे सांगितले व आंदोलन थांबवण्याची विनंती केली.
अन्यथा मंत्रालयाबाहेर धरणे धरणार
वारंवार पाठपुरावा करून, आंदोलने करून, न्यायालयात जाऊनही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी मिळत नसल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आता हक्काच्या पैशांसाठी भीक मागायची का असा सवाल दीपक जुवाटकर यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि इतर सर्व प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर एका महिन्यात सर्व देणी मिळतात. मग बेस्टच्या कर्मचाऱ्यांवरच अन्याय का, असा सवालही त्यांनी केला आहे. यानंतरही जर आम्हाला आमच्या हक्काच्या पैशांसाठी भीक मागावी लागणार असेल तर १५ दिवसानंतर मंत्रालयाबाहेर ही आम्ही धरणे धरणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.