Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्विमाधारकांच्या संख्येत ४४ टक्के घट !  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 16:32 IST

life insurance : आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरीपर्यंत संख्या कमी

मुंबई : २०१९- २० या आर्थिक वर्षांतील एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत देशातील ९ कोटी ८७ लाख लोकांना आयुर्विम्याचे संरक्षण घेतले होते. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरीपर्यंत ती संख्या तब्बल ५ कोटी ४४ लाखांपर्यंत कमी झाल्याची माहिती हाती आली आहे. इश्युरन्स रेग्युलेटरी अँण्ड डेव्हलप्मेंट अथाँरिटीकडे (आयआरडीएआय) देशातील विमा व्यवसायाबाबतची माहिती संकलित केली जाते. तिथल्या नोंदींच्या आधारे ही माहिती हाती आली आहे.

देशात कोरोनाचे संक्रमण वाढत असून त्यात मृत्युमुखी पडणा-यांची संख्या दिवसागणीक वाढू लागली आहे. कोरोनावरील उपचार खर्चाच्या दहशतीमुळे आरोग्य विमा काढणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र, याच कालखंडात आयुर्विमा काढणा-यांचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत एलआयसीसह खासगी विमा कंपन्यांकडे १ कोटी १६ हजार पाँलिसी काढण्यात आल्या होत्या. यंदा ती संख्या २२ टक्क्यांनी घट झाली असून ती संख्या ९० लाख ८५ हजार इतकी आहे. पहिल्या वर्षीच्या प्रिमियमपोटी यंदा विमा कंपन्यांच्या तिजोरीत १ लाख २५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा १ लाख २४ हजार कोटी होती. तसेच, विम्याचे संरक्षण घेणा-यांसाठी सम अँश्युअर्डची रक्कम गेल्या वर्षी २१ लाख ६४ हजार कोटी होती. ती यंदा २० लाख १ हजार कोटींवर आली असून ही घट ७.५१ टक्के असल्याचे आकडेवारी सांगते. कोरोना संकटामुळे आयुर्विमा काढण्यापेक्षा सध्या आरोग्य विम्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे हा विमा काढणा-यांचे प्रमाण कमी झाल्याचे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

७० टक्के वाटा एलआयसीचा : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही सरकारी आणि अन्य २३ खासगी कंपन्या या विमा क्षेत्रात कार्यरत आहेत. एलआयसीकडे एकूण व्यवहाराच्या ७०.५७ टक्के वाटा आहे. तर, खासगी कंपन्यांचा वाटा २९.४३ टक्के आहे. गेल्या काही महिन्यांत खासगी कंपन्यांचा वाटा वाढत असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक