पालिकेच्या ४२६ घरांसाठी २० नोव्हेंबरला सोडत; बाजारभावापेक्षा महाग असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:54 IST2025-10-16T11:54:08+5:302025-10-16T11:54:27+5:30
आजपासून १४ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज, २१ नोव्हेंबरला प्रतीक्षा यादीतील नावे प्रसिद्ध

पालिकेच्या ४२६ घरांसाठी २० नोव्हेंबरला सोडत; बाजारभावापेक्षा महाग असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विकासकांकडून प्रीमियमच्या बदल्यात चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील निवासी प्रकल्पातून मुंबई महापालिकेला मिळालेल्या ४२६ घरांची ऑनलाइन सोडत २० नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. या घरांसाठी १६ ऑक्टोबरपासून अर्ज भरता येतील.
मुंबईतील अत्यल्प व अल्प गटासाठी २७० ते ४८९ चौरस फुटांची ही घरे भांडुप, जोगेश्वरी, कांदिवली, गोरेगाव, भायखळा या ठिकाणी आहेत. ५४ लाख २७ हजार ते एक कोटीवर घरांची किंमत आहे. बाजारभावापेक्षा अधिक किंमत असलेली ही महागडी घरे सर्वसामान्यांना न परवडणारी आहेत, अशा प्रतिक्रिया मुंबईकरांच्या आहेत.
विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली - २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अंतर्गत चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबविणाऱ्या विकासकांकडून पालिकेला प्रीमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. या नियमाच्या पार्श्वभूमीवर बड्या विकासकांकडून ८०० घरे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. त्यातील ४२६ घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या घरांसाठी आजपासून १४ नोव्हेंरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबरला, तर सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे २१ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
५४ लाख ते एक कोटी रुपये घरांची किंमत
अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या या घरांची किंमत ५४ लाख २७ हजार ते एक कोटीवर असणार आहे. जोगेश्वरीला अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घराची किंमत ५४ लाख २७ हजार, तर भायखळा येथे एक कोटी रुपयांवर किंमत असणार आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी घराची किंमत कमीत कमी ७८ लाख ५० हजार ते जास्तीच जास्त ९७ लाख ८६ हजार असणार आहे. सर्वाधिक किमतीची घरे कांदिवली परिसरात असून, त्यांची किंमत एक कोटीपर्यंत आहे, तर सर्वांत कमी कितीची घरे जोगेश्वरी पूर्वेत असून, त्यांची किंमत ५४ लाखांपर्यंत आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी घरे
ठिकाण घरे किंमत
कांदिवली ४ ८१,७९,२१७
कांजूर २७ ९७,८६,३९२
मरोळ, अंधेरी (पू) १४ ७८,५०,९१०
कुठे, किती घरे उपलब्ध (अत्यल्प गटासाठी)
ठिकाण घरे किंमत (रु.)
एलबीएस मार्ग, भांडुप (प.) २४० ६३,५०,९८६
वाढवण, कांदिवली पूर्व ३० ६३,७७,१६२
दहिसर ०४ ६६,४०,०९०
प्रेस्टिज, भायखळा ४२ १,०१,२५,१०९
जोगेश्वरी पूर्व ४६ ५४,२७,४०४
पिरामल नगर, गोरेगाव १९ ५९,१५,६०२