Kurla Crime: मुंबईच्या कुर्ला परिसरात हादरवणारी घटना समोर आली आहे. कुर्ल्यात एका महिलेने आईची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली. ४१ वर्षीय मुलीने आपल्या वयोवृद्ध आईला संपवल्याने पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आईच्या हत्येनंतर आरोपी महिलेने स्वतः पोलीस ठाण्यात जात हत्येची कबुली दिली. पोलिसांच्या चौकशीत हत्येचे धक्कादायक कारण समोर आलं असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
कुर्ल्यातील एका ४१ वर्षीय महिलेने आपल्या ६२ वर्षीय आईची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईचे मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम असल्याच्या समजामुळे धाकटी मुलगी प्रचंड नाराज होती. याच रागातून मुलीने आईची निर्दयीपणे हत्या केली. महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गुरुवारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.
कुर्ल्याच्या कुरेशी नगर परिसरात राहणाऱ्या रेश्मा मुजफ्फर काजी या आरोपी महिलेला तिची आई सबीरा बानो अजगर शेख ही मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करायची असं वाटायचं. याच रागातून रेश्माने आईची हत्या केली. रेश्माची आई मुलासोबत मुंब्रा येथे राहते. मात्र गुरुवारीच ती मुलीला भेटण्यासाठी कुर्ला येथे कुरेशी नगर येथे आली होती.
यावेळी आई आपल्यापेक्षा आपल्या मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते आपला तिरस्कार करते, या भावनेतून रेश्मा आईशी भांडू लागली. हे भांडण वाढले आणि रेश्माने आईवर घरातील चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यांनतर रेश्माने चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून आपण आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.