लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ अखेरीस पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी या ‘सर्किट बेंच’ची स्थापना करण्यात येईल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होणार आहे. या ‘सर्किट बेंच’च्या अधिकार क्षेत्रात सहा जिल्हे येणार आहेत. कोल्हापूर आणि अन्य जिल्ह्यांनी या ‘सर्किट बेंच’च्या मागणीसाठी गेली ४० वर्षे लढा दिला होता.
हे ‘सर्किट बेंच’ स्थापण्याबाबत मुख्य न्या. आलोक आराधे यांनी शुक्रवारी अधिसूचना काढली. ‘राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ (१९५६ चा क्रमांक ३७) च्या कलम ५१ च्या उपकलम (३) द्वारे प्रदान अधिकारांचा वापर करून मी मुंबई येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या मान्यतेने, १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खंडपीठे बसू शकतील,’ असे अधिसूचनेत म्हटले आहे.
कोल्हापूर ‘सर्किट बेंच’मध्ये दोन एकलपीठे व दोन खंडपीठे बसविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सोमवारी चित्र स्पष्ट होईल. या ‘सर्किट बेंच’च्या उद्घाटनाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व अन्य न्यायमूर्ती उपस्थित असणार आहेत.
अधिकार क्षेत्रात कोणते जिल्हे? : सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्याला यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड असणार आहे. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
कोल्हापूरच्या जनतेचा हा विजय आहे. ४० वर्षे हा लढा सुरू ठेवला. अखेरीस यश मिळाले. या ‘सर्किट बेंच’मुळे सामान्यांना न्याय मिळविणे सोपे होईल. - ॲड. धैर्यशील सुतार, उच्च न्यायालयातील वकील.