थेरोंड्यातील ४० कुटुंबे वाळीत

By Admin | Updated: February 17, 2015 01:51 IST2015-02-17T01:51:32+5:302015-02-17T01:51:32+5:30

जाहीररीत्या शपथ घेण्यास नकार देणाऱ्या अलिबाग तालुक्यांतील थेरोडा-आगलेचीवाडीमधील तब्बल ४० कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे.

40 families in Thorond | थेरोंड्यातील ४० कुटुंबे वाळीत

थेरोंड्यातील ४० कुटुंबे वाळीत

जयंत धुळप ल्ल अलिबाग
२०१०मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी, विशिष्ट पक्षाच्या उमेदवारासच मतदान करावे, यासाठी गावकीच्या सभेत जाहीररीत्या शपथ घेण्यास नकार देणाऱ्या अलिबाग तालुक्यांतील थेरोडा-आगलेचीवाडीमधील तब्बल ४० कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे. या ४० कुटुंबांवरील सामाजिक बहिष्कार मागे घेऊन, गावात सामाजिक सलोखा अबाधित राहावा, याकरिता पोलीस व महसूल प्रशासनाच्या माध्यमातून दोनदा बैठकाही घेण्यात आल्या. मात्र त्यास गावकीने नकार दिला.
या प्रकरणी रेवदंड्यातील गावपाटील माणिक बळी, रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंदा बळी, थेरोंडा-आगेलेचीवाडी गावपाटील, रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य आणि थेरोंडा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन सुरेश ढोलके, रेवदंडा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर टिवळेकर, गावकी पंच व रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य दत्ता मुंबईकर, गावकीपंच गजानन धंबा, गावकीपंच गजानन झेंडेकर, गावकीपंच धर्मा बळी, प्रवीण गणतांडेल, रमेश टिवळेकर व उमेश जावसेन या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी ४० वाळीतग्रस्त कुटुंबांनी रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
वाळीतग्रस्त कुटुंबाला, जिल्हा परिषदेमार्फत मागील वर्षी घरकूल मंजूर झाले होते. मात्र घरबांधणीसाठी जागा देण्यास त्यांनी मनाई केली. त्यामुळे सरकारी योजनेचा लाभदेखील घेता आला नाही. गावाशी संबंध नसलेले डॉ. शिंदे व किसन गुप्ता यांना जागेचा मोबदला घेऊन त्यांना जागा दिली व वाळीतग्रस्त कुटुंबांवर जाणीवपूर्वक अन्याय केला. ग्रामपंचायतीच्या परवानगीविना वाटप करण्यात आलेल्या जागांचे वाटप कायस्वरूपी रद्द करावे, अशीही मागणी त्यांनी जिल्हाधिकारी भांगे यांच्याकडे केली. कारवाई केली नाहीतर रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर २ मार्चपासून ४० साखळी उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

वाळीत टाकल्यावर माणिक लक्ष्मण बळी, सुरेश ढोलके, ज्ञानेश्वर टिवळेकर यांच्या आदेशांचे पालन करणाऱ्या त्यांच्या मर्जीतील लोकांना सरकारी गुरचरण क्षेत्रातील जागा ग्रामपंचायत, तलाठी तसेच तहसीलदार यांना न क ळविता, भूखंडांचे वाटप करण्यात आले. वाळीत टाकलेल्या कुटुंबांना यातून वगळण्यात आले. माणिक लक्ष्मण बळी व गाव पाटील या त्रिकूटाकडून वाळीत टाकलेल्या कुटुंबीयांनी जागेची मागणी केली असता, त्यांना दमदाटी करून मारहाणीची धमकी दिली.

सामाजिक बहिष्कारांच्या प्रकरणांत प्रथम वाद मिटवून सामंजस्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असतो. अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार यांच्या उपस्थितीत गावात यापूर्वी दोनदा संयुक्त सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र बैठका होऊन कोणताही समझोता झाला नाही. अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- सुमंत भांगे, जिल्हाधिकारी, रायगड

वाळीतग्रस्त कुटुंबे : सूर्यकांत नारायण टिवळेकर, दत्तात्रेय मोतीराम सिद्धी, दीपक चांगू बळी, संतोष बाळकृष्ण टिवळेकर, पंढरी चांगू बळी, ज्ञानेश्वर मल्हारी बामपाटील, संतोष आ. ढोलके, वनमाला दत्तात्रेय खंडेराय, नितीन रामकृष्ण बळी, दत्तात्रेय गोमा बळी, कपिल रामकृष्ण बळी, मोतीराम गोमा सिद्धी, संतोष गोपीनाथ टिवळेकर, मधुकर मोतीराम पारखी, बळीराम जाया टिवळेकर, शशिकांत सदाशिव टिवळेकर, भरत नारायण टिवळेकर, अमोल कृष्णा टिवळेकर, बाळाराम बाळकृष्ण टिवळेकर, परशुराम जानू टिवळेकर, धीरज चंद्रहास टिवळेकर, राहुल अशोक टिवळेकर, संजय यशवंत टिवळेकर, संजय मल्हारी जावसेन, सुशांत अशोक बळी, रोकेश बाळकृष्ण टिवळेकर, महेश बळीराम टिवळेकर.

 

Web Title: 40 families in Thorond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.