बी.कॉम.च्या परीक्षेमध्ये ३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 01:44 PM2023-06-08T13:44:47+5:302023-06-08T13:45:33+5:30

विद्यापीठाने हा निकाल निर्धारित वेळेत जाहीर केला आहे. 

38 percent students pass b com exam result announced by mumbai university | बी.कॉम.च्या परीक्षेमध्ये ३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून निकाल जाहीर

बी.कॉम.च्या परीक्षेमध्ये ३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून निकाल जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  मुंबई विद्यापीठाने  एप्रिल २०२३ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ६ या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत १५,३४६ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३८.३२ एवढी आहे. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व  मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले आहे. विद्यापीठाने हा निकाल निर्धारित वेळेत जाहीर केला आहे. 

बी.कॉमसह आतापर्यंत ५३ परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत. या परीक्षेत ६३,३५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ६०,२८५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये १५,३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २४,७०१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ३८.३२ टक्के एवढा लागला आहे. ३०६९ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. २८५ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत.

मूल्यांकनावर कुलगुरूंचे विशेष लक्ष

उन्हाळी सत्रात  झालेल्या परीक्षेच्या मूल्यांकनावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे हे सतत लक्ष ठेवून होते. सर्व परीक्षांचे मूल्यांकन वेळेत होऊन निकाल वेळेत लावण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापकांच्या विशेष बैठका घेतल्या.  तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकन करून घेण्यात सक्रिय सहभाग दाखविला. यामुळे शिक्षकांनी उन्हाळी सुटीतही उत्तरपत्रिकांचे मोठ्या प्रमाणावर मूल्यांकन केले. 

सर्व्हरच्या क्षमतेत वाढ 

साठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्याने बी.कॉम. सत्र ६ च्या आसन क्रमांकानुसार फाइल्स करून त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या. जेणेकरून विद्यार्थ्यास संकेतस्थळावर निकाल पाहणे सोपो होईल. यासाठी सर्व्हरची क्षमताही वाढविण्यात आली आहे. हा निकाल विद्यापीठाच्या  संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे.

बी. कॉम सत्र ६ चा निकाल हा विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी  महत्त्वाचा असून, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच हा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले. - डॉ. डी. टी. शिर्के कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

बी.कॉमच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याकारणाने हा निकाल वेळेत लावण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. -  डॉ. प्रसाद कारंडे. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ


 

Web Title: 38 percent students pass b com exam result announced by mumbai university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.