गणेशोत्सवासाठी ३५१ बस झाल्या फुल्ल; मुंबई विभागातून सुटणार ११०० गाड्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 11:13 IST2023-08-11T10:21:15+5:302023-08-11T11:13:23+5:30
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे एक अतूट असे नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस.टी. धावत असते.

गणेशोत्सवासाठी ३५१ बस झाल्या फुल्ल; मुंबई विभागातून सुटणार ११०० गाड्या!
मुंबई :
कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबरदरम्यान साजरा आहे. एस.टी. महामंडळाच्या मुंबई विभागाने यंदा ११०० गाड्यांचे नियोजन केले असून ३५१ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून त्यामध्ये १५१ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे एक अतूट असे नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस.टी. धावत असते. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बस सोडण्यात येणार आहे. यासाठी मुंबई विभागातून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या बसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर, मोबाइल ॲपव्दारे, खासगी बुकिंग एजंट व त्यांच्या ॲपवर उपलब्ध होणार आहे.
आधारकार्डची छायांकित प्रत
गेल्या दोन दिवसांत १५१ ग्रुप बुकिंग झाले आहे. या ग्रुप बुकिंगमध्ये ६५ ते ७५ वय असलेल्या ज्येष्ठांना ५० टक्के तर महिलांसाठी ५० टक्के तिकिटांमध्ये सवलत देण्यात येत आहे. संबंधित ग्रुप बुकिंगधारकांनी ज्येष्ठ नागरिकांचे आधारकार्डची छायांकित प्रत यादीसोबत जोडणे महत्त्वाचे आहे.
गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यासाठी रेल्वे बरोबरीने एस.टी. प्रशासनाकडूनही विशेष गाड्या आरक्षित केल्या जातात. आतापर्यंत ३५१ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. आणखी गाड्यांचीही मागणी वाढत असते ७८ गाड्यांच्या बुकिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे.