विरार-डहाणू रेल्वे मार्गाचे ३५ टक्के चौपदरीकरण पूर्ण; नव्या मार्गिकेमुळे २०० लोकल फेऱ्या वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:34 IST2025-03-17T11:32:26+5:302025-03-17T11:34:36+5:30
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी ३ कोटी ५७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा ६४ किमीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात नवी तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विरार-डहाणू रेल्वे मार्गाचे ३५ टक्के चौपदरीकरण पूर्ण; नव्या मार्गिकेमुळे २०० लोकल फेऱ्या वाढणार
मुंबई : मुंबईरेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून सुरू असलेल्या विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम ३५ टक्के पूर्ण झाले आहे. ते २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक्ष्य आहे, अशी माहिती रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेच्या २००हून अधिक फेऱ्या वाढतील, असा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी ३ कोटी ५७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा ६४ किमीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात नवी तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेलवेच्या विरार आणि डहाणू रोड दरम्यानच्या सध्याच्या दुहेरी मार्गावर उपनगरीय, मालवाहतूक आणि एक्स्प्रेस गाड्यांचा भार अधिक आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या कार्यक्षमतेवर होतो. शिवाय, या भागातील रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्यातही अडचणी येत होत्या. या नव्या मार्गिकांमुळे प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. विरार ते डहाणू आणि चर्चगेट ते डहाणूदरम्यान सेवांची वाढ करण्यास मदत होणार आहे.
सध्या चर्चगेट ते डहाणूदरम्यान दिवसभरात ६ ते ७ थेट गाड्या धावतात. चौपदरीकरणामुळे विरार-डहाणू दरम्यानच्या सेवा, तसेच संपूर्ण मार्गावर २०० पेक्षा अधिक सेवा चालवल्या जाऊ शकतात. सध्या विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, डहाणू रोड आणि उमरोली स्थानकांसह पुलांवर स्टेशन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्प उपनगरीय आणि मुख्य रेल्वे नेटवर्कवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. तो वेळेत पूर्ण करणार आहोत. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सेवांमध्ये वाढ होऊन लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.
विलास सोपन वाडेकर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी.