गळती, चोरी, सदोष मीटरमुळे ३२ टक्के महसूल 'पाण्यात'; मुंबईत ६०० दशलक्ष लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:11 IST2025-12-14T10:10:47+5:302025-12-14T10:11:48+5:30
पाणी बचतीसाठी महापालिका सजग

गळती, चोरी, सदोष मीटरमुळे ३२ टक्के महसूल 'पाण्यात'; मुंबईत ६०० दशलक्ष लिटर पाणी वाया
जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबई महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसऱ्या बाजूला पाणी गळती, अनधिकृत जलजोडण्या, सदोष मीटर यामुळे पालिकेचा सुमारे ३२ टक्के महसूल बुडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईत होणारी पाणीचोरी आणि पाणी गळतीचे प्रमाण हे पुणे शहराला रोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याएवढे म्हणजे सुमारे ६०० दशलक्ष लिटर एवढे आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची नासाडी आणि नुकसान किती मोठ्या प्रमाणावर होते, हे स्पष्ट होते.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून, अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. अनेक ठिकाणी अनधिकृत जलजोडण्या घेतल्या आहेत. काही ठिकाणचे मीटर सदोष आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी आणि आर्थिक नुकसान होते. त्यासाठी जुन्या जलवाहिन्यांच्या जागी जलबोगद्यातून पाणी वाहून नेण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. त्यामुळे पाणी चोरी आणि गळतीला आळा बसणार आहे. मात्र जलबोगदे बांधणे ही व्यवहार्य योजना असली तरी ती वेळखाऊही आहे. मुंबईला रोज ४,६०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्याची गरज आहे.
४,१०० दशलक्ष लिटर एवढा पुरवठा होतो. म्हणजे मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. मात्र गारगाई, पांजाळ प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा ६५० दशलक्ष लिटर पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.
प्रकल्प पूर्ण होण्यास २०२९ सालापर्यंत प्रतीक्षा
गारगाई, पांजाळ हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २०२९ सालापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिक तेव्हा पाण्याची मागणी आणखी वाढून मागणी आणि तफावत यातील फरक कायम राहील, याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञ लक्ष वेधतात.
'सर्वांना पाणी' तत्त्वानुसार अनेक जोडण्या अधिकृत...
१. जुन्या जलवाहिन्यांच्या ठिकाणी नव्या जलवाहिन्या टाकण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तानसा येथील जुन्या जलवाहिन्या बदलून तेथे नव्या जलवाहिन्यांची जोडणी दिली जात आहे.
२. मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी जलवाहिन्या बदलायची कामे सुरू आहेत. त्यामुळे सध्या अनेक भागात पाणी कपात असली तरी पाणीपुरवठ्यात नक्की सुधारणा होईल, असे माळवदे यांनी सांगितले.
३. अनधिकृत जलजोडण्यांपैकी 3 गेल्या काही वर्षात 'सर्वांना पाणी' या तत्त्वानुसार अनेक जोडण्या अधिकृत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महसुलातही वाढ होईल, असेही ते म्हणाले.