उतारवयात का आठवतोय घटस्फोट? ३० लाख ज्येष्ठांना व्हायचंय स्वतंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:39 IST2025-04-19T16:39:45+5:302025-04-19T16:39:45+5:30

कुटुंब न्यायालयातील आकडेवारीतून मानसिकता उघड; विरक्तीची भावना अन् बंधनमुक्तीची आस

30 lakh seniors want to be independent Family court statistics reveal mindset | उतारवयात का आठवतोय घटस्फोट? ३० लाख ज्येष्ठांना व्हायचंय स्वतंत्र

उतारवयात का आठवतोय घटस्फोट? ३० लाख ज्येष्ठांना व्हायचंय स्वतंत्र

मुंबई : राज्यातील कुटुंब न्यायालयात ज्येष्ठ नागरिकांच्या घटस्फोटासंबंधी २९ लाख ८४ हजार २४१ प्रकरणे प्रलंबित आहेत. या आकडेवारीतून ज्येष्ठांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण किती वाढले आहे, हे वास्तव समोर येत आहे. उतारवयात एकमेकांना आधार देण्याऐवजी एकमेकांची साथ सोडण्यासाठी धडपड करणारी दाम्पत्ये कुटुंब न्यायालयात आता पाहायला मिळत आहेत.

मुळात तरुण पिढीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल वयोवृद्धांकडून चिंता व्यक्त केली जाते. मात्र आता ज्येष्ठदेखील मोठ्या संख्येने घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढताना दिसत आहेत. याला वैवाहिक कलह, साथीदाराने केलेली प्रतारणा यासह अनेक कारणे आहेत. त्यातही एक कारण पुढे येत आहे, ते म्हणजे संसार करून तृप्त झालेल्या मनाला विरक्तीची आस लागलेली असते. बंधने नको असतात. तारुण्यात अर्धवट राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. छंद जोपासायचे असतात. म्हणूनही ज्येष्ठांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

तडजोड हाच एकत्र राहण्याचा मंत्र! 

काही जणांचे विवाहबाह्य संबंध असतात, तर काहींच्या घरात वैवाहिक वाद असतात. पण, मुला-बाळांकडे बघून संसार रेटला जातो. सासू-सासरे, आई-वडिलांच्या दबावाखाली हे जोखड घेऊन २५-३० वर्षे कशीबशी काढली जातात. मग, मुले मोठी झाली की, आई-वडिलांची नात्यातील घुसमट पाहून तेच त्यांना विभक्त होण्याचा सल्ला देतात. अशीही काही प्रकरणे आहेत, असे अॅड. अनिकेत चव्हाण यांनी सांगितले.

जबाबदारीतून मुक्त झालो, आता बस्स...

अनेकांना मुलाबाळांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर जबरदस्तीने निभावत असलेल्या नात्यातून त्यांना सुटका हवी असते, असेही घटस्फोटाचे कारण असते, असे चव्हाण यांनी सांगितले.

'सिल्वर ज्युबिली सेपरेशन'चे लोण! 

अॅड. रुपाली जोशी यांनी सांगितले की, घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये पन्नाशी-साठीनंतरच्या जोडप्यांची संख्या लक्षणीय आहे. पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्याकडे 'सिल्वर ज्युबिली सेपरेशन' ही संकल्पना नाही. पण सध्याची मानसिकता पाहता ते लोण पसरत चाललंय की काय? अशी शंका येते.

लग्नाला ३० वर्षे झालेली चार-पाच जोडपी नुकतीच सल्ला घेऊन गेली. इतके वर्षे एकाच छताखाली राहून यांची मने जुळली नाही का? असा प्रश्न पडला. चर्चेनंतर काही कारणे पुढे आली.

त्यात मुख्य म्हणजे 'एम्प्टीनेस सिंड्रोम'. मुले परदेशात किंवा अन्य ठिकाणी स्थायिक झाली की, भरलेले घरटे रिकामे होते आणि रिकामेपण येते. ते असह्य झाल्याने काहींचे मानसिक स्वास्थ बिघडते आणि त्यातूनही घटस्फोट घेण्याचे प्रमाण आहे.
 

Web Title: 30 lakh seniors want to be independent Family court statistics reveal mindset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.