जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड
By मनोज गडनीस | Updated: March 19, 2024 16:04 IST2024-03-19T16:04:20+5:302024-03-19T16:04:43+5:30
सुहास भालेराव असे या सहाय्यक आयुक्ताचे नाव असून त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या निरिक्षकाचे नाव शुभम दास मोहपात्रा असे आहे.

जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड
मुंबई - वाहतूक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीच्या मालकाला कारणे दाखवा नोटिस जारी केल्यानंतर, ते प्रकरण मिटवण्यासाठी दीड लाख रुपयांची लाचखोरी करणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचा सहायय्क आयुक्ताला गेल्या शुक्रवारी सीबीआयने अटक केल्यानंतर त्याच्या घरी केलेल्या छापेमारी दरम्यान त्याच्या घरी ३० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. तसेच, काही मालमत्तांची कागदपत्रे देखील सापडली असून त्या मालमत्ता संबंधित अधिकाऱ्याच्या उत्पन्नाशी मेळ खातात अथवा नाही, याची आता पडताळणी सीबीआयचे अधिकारी करत आहेत.
सुहास भालेराव असे या सहाय्यक आयुक्ताचे नाव असून त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या निरिक्षकाचे नाव शुभम दास मोहपात्रा असे आहे. प्राप्त माहितीनुसार, एका वाहतूक कंपनीला जीएसटी विभागाच्या सुहास भालेराव या सहाय्यक आयुक्ताने एका प्रकरणात कारणे दाखवा नोटिस जारी केली होती. या नोटिशीच्या अनुषंगाने संबंधित कंपनीच्या संचालकाने जीएसटी कार्यालयात कागदपत्रे देखील सादर केली होती. मात्र, ती कागदपत्रे पाहिल्यानंतर, हे प्रकरण मिटवण्यासाठी भालेराव याने संबंधित कंपनीच्या संचालकाकडे सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीनंतर ही रक्कम दीड लाख रुपये इतकी निश्चित झाली.