पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक; तब्बल २,७०० लोकल रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:08 IST2023-10-12T14:00:28+5:302023-10-12T14:08:24+5:30
याचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार असून, तब्बल २,७०० लोकल रद्द केल्या जाणार असून, ४०० गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक; तब्बल २,७०० लोकल रद्द!
मुंबई : पश्चिम रेल्वेकडून खार - गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी २९ दिवसांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. याचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्यालोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार असून, तब्बल २,७०० लोकल रद्द केल्या जाणार असून, ४०० गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.
तसेच ६०हून अधिक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत. गाड्या रद्द करण्याचे प्रमाण २० ऑक्टोबरपासून पुढे जास्त असणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज १,३०० हून अधिक लोकल गाड्या चालवल्या जातात. अनेक एक्स्प्रेस गाड्याही चालवल्या जातात. मात्र, वांद्रे टर्मिनस ते गोरेगावपर्यंत पाचवी मार्गिका आहे. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल ट्रेनबरोबरच एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगावर परिणाम होतो. त्याची दखल घेतल पश्चिम रेल्वेने पाचव्या मार्गिकेला समांतर सहावी मार्गिका खार - गोरेगावदरम्यान टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
२० ऑक्टोबरपासून अनेक लोकल रद्द
- ब्लॉकच्या सुरुवातीला पहिल्या तेरा दिवसात एकही गाडी रद्द होणार नाही.
- मात्र, २० ऑक्टोबरपासून अनेक लोकल रद्द केल्या जाणार आहेत.
- २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक ४०० लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
- त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
४ नोव्हेंबरपासून २४ तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर ५ नोव्हेंबरपर्यंत जम्बो ब्लॉक चालणार आहे. ब्लॉकच्या शेवटच्या दोन दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबरच्या रात्री ९:०० वाजल्यापासून दसऱ्या दिवशी रात्री ९:०० वाजेपर्यंत २४ तासांचा ब्लॉक असेल. या काळात वांद्रे टर्मिनसमध्ये जाणारे रेल्वे ट्रॅक काढण्याचे आणि जोडण्याचे काम केले जाणार आहे.