लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील विमानांच्या सुरक्षेसंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचनालयातर्फे (डीजीसीए) करण्यात येणाऱ्या वार्षिक लेखापरीक्षणामध्ये देशातील विविध कंपन्यांच्या विमानांमध्ये एकूण २६३ त्रुटी आढळल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक अर्थात ५१ त्रुटी या एअर इंडियाच्या विमानांत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनी असून, या कंपनीच्या विमानात २५, तर तिसऱ्या क्रमांकावरील इंडिगो कंपनीच्या विमानांत २३ त्रुटी आढळल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या निकषांनुसार विमानांच्या सुरक्षेचे वार्षिक परीक्षण करणे प्रत्येक देशाला बंधनकारक आहे. त्यानुसार हे परीक्षण करण्यात आले आहे. यात इतरही काही मुद्दे समोर आले असून, एअर इंडिया कंपनीमध्ये काही वैमानिकांना अपुरे प्रशिक्षण, मान्यता नसलेल्या सिम्युलेटरचा वापर, कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात त्रुटी हे मुद्दे अधोरेखित झाले आहेत. मात्र, या मुद्द्यांचा एअर इंडियाच्या अलीकडेच झालेल्या विमान अपघाताशी संबंध नसल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. मात्र या त्रुटींमुळे विमानातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.