गोरेगावात बांधकाम साईटवर हत्या; चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारहाण; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:24 IST2025-10-21T12:17:17+5:302025-10-21T12:24:42+5:30
गोरेगाव येथे बांधकाम साईटवर चोर समजून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला.

गोरेगावात बांधकाम साईटवर हत्या; चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारहाण; चौघांना अटक
Goregaon Crime: मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे चोर असल्याच्या संशयावरून एका २६ वर्षीय तरुणाला मारहाण करत ठार करण्यात आलं. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील मजुरांनी तरुणाला चोर असल्याचे समजून अमानुष मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. हा भयानक प्रकार १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास गोरेगावच्या सुभाष नगर, तीन डोंगरी येथील 'राज पथरोन' इमारतीच्या बांधकाम साईटवर घडला.
मृत तरुणाची ओळख हर्षल परमार (२६) अशी पटली आहे. त्याची आई सुवर्णा रामसिंग परमार यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुवर्णा यांनी पोलिसांना सांगितले की, १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हर्षल 'दारू पिऊन येतो' असे सांगून घरातून बाहेर पडला, मात्र तो रात्रभर परतला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४५ वाजता गोरेगाव पोलिसांचे अधिकारी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी हर्षलला 'राज पथरोन' इमारतीत काही लोकांनी मारहाण केल्याची आणि तो ट्रॉमा केअर रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगितले.
सुवर्णा परमार आणि त्यांचे पती रामसिंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना काही लोकांनी चोरीच्या उद्देशाने इमारतीत प्रवेश केला होता आणि त्यातील एकाला पकडून मजुरांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचा वॉचमन पप्पू दूधनाथ यादव याने रात्री काय घडलं ते सांगितले. १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या वसंत कुमार प्रसाद नावाच्या मजुराने त्याला सांगितले की, चार चोरटे इमारतीत घुसले होते, त्यापैकी तिघे पळून गेले आणि एक जण पकडला गेला आहे. यादव वरच्या मजल्यावर गेला असता, काही मजूर एका तरुणाला बांधून मारहाण करत असल्याचे त्याने पाहिले. त्या तरुणाने आपले नाव हर्षल परमार असल्याचे सांगितले.
यादव याच्या म्हणण्यानुसार, सलमान खान हा बांबूने हर्षलला मारहाण करत होता, तर इस्मुल्ला खान लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. यादव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, मजुरांनी त्याला तुझं काम कर आणि इथून निघून जा असे धमकावले. त्यामुळे वॉचमन यादव भीतीपोटी खाली गेला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वॉचमन यादवला हर्षल पार्किंगच्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. त्याने तातडीने साईट सुपरवायझर प्रदीप मिश्रा यांना याची माहिती दिली आणि मिश्रा यांनी पोलिसांना बोलावले.
सुवर्णा परमार आणि त्यांचे पती ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी हर्षलला तपासले आणि रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सुवर्णा यांनी आरोप केला आहे की, गौतम चमार, राजीव गुप्ता, सलमान खान आणि इस्मुल्ला खान या मजुरांनी हर्षलला चोर समजून बांधून ठेवले आणि पहाटे ३ ते ७ या वेळेत बांबूच्या काठ्या, लाथा व बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण करून त्याचा खून केला.
दरम्यान, या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता'च्या संबंधित कलमांखाली खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.